Corona Effect: तिरुपती बालाजी देवस्थानला पैशांची चणचण, शिर्डीच्या साई मंदिराने दाखवले उदार मन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:54 PM2020-05-15T14:54:36+5:302020-05-15T14:54:54+5:30
तिरुपती देवस्थानाचे दोन महिन्यांत सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तब्बल 21 हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेळेवर पगार देण्यात आला नसून पगार देण्यास उशीर होईल,असे मंदिर प्रशासनाकडून कर्मचार्यांना कळविण्यात आले आहे.
देशातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे तिरुपती बालाजी मंदिरही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटातून जात असल्याचे वृत्त आले होते. बालाजी मंदिरातील सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन, देखरेख व सुरक्षेवर ११० कोटी रुपये महिना खर्च होत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे मंदिरात भक्तगण येत नसल्याने येणाऱ्या देणग्यादेखील बंद झाल्या आहेत. परिणामी तिरुपती देवस्थानाचे दोन महिन्यांत सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तब्बल 21 हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेळेवर पगार देण्यात आला नसून पगार देण्यास उशीर होईल,असे मंदिर प्रशासनाकडून कर्मचार्यांना कळविण्यात आले आहे.
ही बातमी येताच अनेकांच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा काहुर माजला असणार, इतका पैसा या मंदिराच्या ट्रस्टने घालवला तरी कुठे? याचे उत्तर मिळणे कठिण असले तरीही सध्या तिरूपती मंदिराच्या ट्रस्टजवळ पैसा नसल्याची माहितीवर जरा विश्वास ठेवणे अशक्यच आहे. एकीकडे तिरुपती बालाजी मंदिरातील कर्मचाऱ्यांसंदर्भात असे वृत्त असताना, दुसरीकडे शिर्डीचे साईबाबाचे देवस्थान मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे.
शिर्डी देवस्थानच्या ट्रस्टने ६ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी, मंदिर ट्रस्टची एफडी मोडून सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले आहेत. साईबाबा देवस्थान ट्रस्टकडे सुमारे २५०० कोटी रुपयांची एफडी आहे. लॉकडाऊनचा परिणाम शिर्डी साईबाबा मंदिरावरही झाला असून देणग्यांचं प्रमाण घटलं आहे. गेल्या दोन महिन्यांत, केवळ अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाइन देणग्या मिळाल्या आहेत. एकंदरीत साईबाबा मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न पाहता ही देणगी रक्कम कमीच आहे. मंदिर ट्रस्टला दरवर्षी सरासरी ७०० कोटी रुपयांचा निधी देगणीस्वरुपात मिळतो. मात्र, लॉकडाऊन काळात हा निधी घटला आहे. तरीही, देवस्थानने कर्मचाऱ्यांसाठी एफडी मोडून त्यांचे वेतन अदा केले. त्यामुळे, देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टनेही कर्मचाऱ्यांप्रति सहानुभूती दाखवून जमा-शिल्लक किंवा आर्थिक बचतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगार करावेत अशी मत व्यक्त होत आहे.