‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 11:35 AM2020-03-05T11:35:44+5:302020-03-05T11:40:28+5:30
तीन महिन्यांपासून चीनमधून आयात बंद
पुणे : कोरोना विषाणू जगासाठी चिंतेचाच विषय झाला आहे; मात्र होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने मागील तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत. त्यामुळे होळीच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.
दर वर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्य मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत येत असते; परंतु या वेळी कोरोनामुळे ती आली नाहीत. शहरातील विक्रेत्यांनी मिरज, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, सुरत, उल्हासनगर या ठिकाणांहून उत्पादने विक्रीसाठी मागवली आहेत.
भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोनाबरोबरच, केंद्र सरकारने मेक इन इंडिया, चीनमधून येणाºया उत्पादनांवर लावलेला कर यामुळे सुद्धा चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठेत कमी झाली आहेत असे विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवर देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असत. परंतु आता स्थितीत बदल झाला असून भारतातील उत्पादने थोडी-फार महाग असली, तरी ती खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याने आगामी काळात भारतीय उत्पादनांना चांगले दिवस येतील, असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.
...............................................................................................
यंदाची होळी ही भारतीय उत्पादन विक्रेत्यांसाठी लाभदायी ठरत आहे. यंदा भारतीय बनावटीच्या उत्पादनाला मागणी दिसून येत आहे. येणाºया सणांमध्ये सुद्धा भारतीय उत्पादनांची मागणी वाढेल, असे दिसून येत आहे. कोरोनामुळे का होईना यंदा विक्रेत्यांसाठी होळी लाभदायी ठरणार आहे.
सुरेश जैन, अध्यक्ष, शहर व्यापारी असोसिएशन
दर वर्षी होळीला ज्याप्रमाणात चिनी उत्पादन भारतीय बाजारपेठेत येते, त्या तुलनेत यंदा ते कमी प्रमाणात आल्यामुळे भारतीय उत्पादनांना मागणी वाढली आहे. ग्राहकांमध्ये भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत जागृतता दिसून येत आहे.
मदन शेंडे, ठोक विक्रेते
...........................................कोरोनामुळे ग्राहक चिनी उत्पादनांची मागणी करत नाही आहे, असे सध्या दिसून येत आहे. भारतीय उत्पादन करणाºया कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे चिनी उत्पादनांवर परिणाम झाला आहे. विशाल मळकेकर, विक्रेते
........................................
समाज माध्यमांमुळे देखील परिणाम समाज माध्यमांवर भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मेसेज फिरत आहे. चिनी रंगांमुळे होणारे परिणाम, चीन-भारत संबंध यांमुळे देखील चिनी उत्पादने कमी प्रमाणात विकली जात आहे.
-----------------
चायना वस्तूंपासून दूर राहा : पालक सध्या सोशल मीडियावर देखील चीनी वस्तू न वापरता होळी साजरी करा, असा संदेश फिरत आहे. त्यामुळे आई-वडिल आपल्या पाल्यांना चायना वस्तूंपासून दूर ठेवत आहेत. चायना वस्तूंपासून ‘कोरोना’ विषाणू कसा आणि कुठून आपल्याला बाधीत करेल, हे सांगता येत नाही, म्हणून चायना माल दूरच ठेवण्याचा प्रयत्न भारतीय पालक करीत आहेत.
............................................................................................