Corona In Maharashtra: "या' पंचसूत्रीची अमंलबजावणी करा'; एकनाथ शिंदेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे निर्देश
By मुकेश चव्हाण | Published: December 22, 2022 08:35 PM2022-12-22T20:35:10+5:302022-12-22T20:37:13+5:30
Corona In Maharashtra: सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ-७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. सध्या चीन, जपान, अमेरिका, ब्राझील, दक्षिण कोरीया या देशांमध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा आहेत. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचसूत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा आहेत. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचसूत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. pic.twitter.com/OXLKUU2sDd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 22, 2022
चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!
दरम्यान, गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.
२२०.०३ कोटी डोस-
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"