‘वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 01:24 AM2020-12-18T01:24:06+5:302020-12-18T01:24:30+5:30
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.
मुंबई : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.राज्य शासनाने मार्च २००५ मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात २७ आकस्मिक आणि ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत. त्यात हृदय आणि फुप्फुसाशी निगडित आजारांचा समावेश असला तरी कोरोनाबाबतच्या उपचाराचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. २ सप्टेंबरपासून शासकीय कार्यालयातील उपस्थितीदेखील वाढविण्यात आली होती. आज जाहीर झालेला हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.