दिलासा! राज्यभरातील कोरोना संसर्ग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:02 AM2021-02-10T05:02:47+5:302021-02-10T05:03:05+5:30
मार्गदर्शन सूचनांची काटेकोर अंमलबजावणी
मुंबई : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग वाढीचा वेग आणि मृत्युदर महाराष्ट्रात कमी आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने मांडले आहे.
सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात होती. त्यातही राज्यातील ७० टक्के रुग्ण पुणे-मुंबईत होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात करीत महाराष्ट्राने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे चित्र सध्या आहे. ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी कोरोनाचे उपचार आणि प्रतिबंधासाठी वारंवार दिलेल्या मार्गदर्शन सूचनांची महाराष्ट्राने काटेकोर अंमलबजावणी केली. त्यासाठी सातत्याने कोरोनाच्या प्रयोगशाळा चाचण्या वाढविल्या. त्यातून सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली.
परंतु, त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्गापासून दूर ठेवता आले, तसेच संसर्ग झालेल्यांवर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसत असले तरी याेग्य उपचाराअंती त्यातून होणारे मृत्यू रोखता आले. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले. राज्यात विशेषतः मुंबई, पुणे या शहरांत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दशलक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
कोविड वाढीचा दर महाराष्ट्रापेक्षा केरळमध्ये सहापट जास्त
राज्यात कोरोनाच्या एकूण मृत्यूंची संख्या जास्त असली तरी मृत्युदर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार राज्यात दररोजचा कोविड वाढीचा दर ०.१० टक्के होता. केरळमध्ये तो महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे ०.६१ टक्के असल्याचे दिसते. गोव्यात ०.२, पंजाब ०.१२, गुजरात आणि छत्तीसगड ०.११ टक्के असा दर होता.