पारायण सप्ताहातून कोरोनाचा संसर्ग, झाडेगावात तब्बल १५५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:05 PM2021-02-23T17:05:56+5:302021-02-23T17:06:35+5:30
CoronaVirus News २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आह. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली. मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्रशासनामार्फत गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
छोट्याशा गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त असल्याने निगेटिव्ह असलेल्यांना विलगीकरणात ठेवावे, असा नवीन आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागाला दिला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना संसर्गाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वेक्षणाअंति नागरिकांची लक्षणे पाहता निगेटिव्ह असलेल्या सर्वांना शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांनी दिली. आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाडेगावसह तालुक्याचा आढावा घेतला आहे. २२ फेब्रुवारी रोजी ५० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
- पारायण सप्ताहातून पसरला कोरोना
२ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली. सर्वप्रथम या ठिकाणच्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावांमध्ये सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. सर्व लोकांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. ही लक्षणे पाहता दि. १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी गावात आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये २१३ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यातील १४१ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर १४ जण अगोदरचे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या छोट्याशा गावात आता कोरोना रुग्णांची संख्या १५५ झाली आहे.