कोरोना वाढतोय! दिवसभरात ६६९ रुग्ण, राज्यात ३३०० बाधित उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 05:54 AM2023-04-02T05:54:56+5:302023-04-02T05:55:47+5:30
राज्याचा मृत्युदर १.८२ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात शनिवारी दिवसभरात ६६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३२४ आहे, यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून ही संख्या १ हजार २१ आहे. राज्यात दिवसभरात ४३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७९ लाख ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्युदर १.८२ टक्के आहे.
मुंबई खालोखाल पुण्यात ७५५, ठाण्यात ५७२ रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत राज्यातील तीन विमानतळांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १६ लाख ४७ हजार ११५ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले, त्यातील ३६ हजार ६६४ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यात ४३ कोविड रुग्णांचे आतापर्यंत निदान झाले आहे, यात दहा रुग्ण पुणे, मुंबईतील आठ, नवी मुंबई, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सातारा प्रत्येकी एक रुग्ण आणि पाच रुग्ण गुजरात, तीन रुग्ण उत्तर प्रदेश आणि केरळ येथील आहे. याखेरीज, तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा येथील प्रत्येकी दोन, गोवा आसाम, तेलंगणा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
एच३एन२ चे ३६१ रुग्ण
- कोरोनासह आता इन्फ्ल्युएन्जाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एच३एन२ चे रुग्ण ३६१
रुग्ण, तर स्वाइन फ्लूचे आतापर्यंत ४५१ रुग्ण आढळले आहेत.
- परिणामी, आरोग्य विभागाने इन्फ्ल्युएन्जासदृश लक्षणे अंगावर न काढता खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान राज्यात ३ लाख ५८ हजार ७३ इन्फ्ल्युएन्जा संशयित आढळले आहेत, त्यातील २ हजार ४३ संशयित फ्लू रुग्णांना ऑसेलटॅमीवीर औषध देण्यात आले आहे.
- सध्या रुग्णालयात ९८ रुग्ण दाखल आहेत, तर आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे तीन आणि एच३एन२ मुळे पाच मृत्यूची नोंद झाली आहे.