corona in kolhapur -कोल्हापुरात चौथा रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 03:50 PM2020-04-06T15:50:38+5:302020-04-06T16:57:42+5:30
कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यात आता या रुग्णाची भर पडली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यात आता या रुग्णाची भर पडली आहे. ही महिला सातारहून कोल्हापुरात आली होती. याबाबत सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासन लवकरच देत आहे. ही महिला ६३ वर्षीय असून तिला न्यूमोनिया झाला होता. सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
कोल्हापुरात उपचार घेणारे दोन आणि मिरज येथे उपचार घेणारी युवती असे एकूण तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते, यात आता चौथ्या रुग्णाची भर पडली आहे . कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. 28 मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली.
दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.
येथील कोरोना विषाणूची लक्षणे असणाऱ्या संशयित एकूण आठ रुग्णांच्या घशातील स्राव (स्वॅब) हे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सकाळी पाठविण्यात आले. त्यात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) सहा, तर अन्य रुग्णालयांतील दोन रुग्णांचा समावेश आहे. पूर्वीच्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची बुधवार (दि. ८) ते दि. १२ एप्रिलदरम्यान सलग दोन दिवस पुन्हा तपासणी आणि त्यांच्या स्रावाची चाचणी केली जाणार आहे.
‘सीपीआर’मधील विशेष तपासणी कक्षातून रविवारपर्यंत ४६१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्ण दाखल आहेत. त्यांचे स्राव मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रविवारी ६५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांतील २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पूर्वी आढळलेल्या कोरोना संशयित दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची बुधवारनंतर सलग दोन दिवस तपासणी आणि त्यांच्या स्रावांची चाचणी करण्यात येणार आहे.
कोरोनाबाबतची रविवारपर्यंतची एकूण आकडेवारी
- तपासलेले प्रवासी अथवा व्यक्ती : ४६१६
- डिस्चार्ज झालेले : १६७
- तपासणी केलेले नमुने : ३००
- तपासणी अहवाल प्राप्त : २९२
- चाचणी अहवाल निगेटिव्ह : २५१