Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; १० दिवस व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:53 AM2021-10-04T06:53:04+5:302021-10-04T06:54:25+5:30
नगर जिल्ह्यातील सध्याची दैनंदिन रुग्णसंख्या ही ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने या गावांमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २४ गावे ही संगमनेर तालुक्यातील आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी जारी केला.
जिल्ह्यातील सध्याची दैनंदिन रुग्णसंख्या ही ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्या गावात २० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत, अशा गावांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर करणे, गावबंदी करणे, कोरोना नियमांचे पालन करणे, शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक होते. याबाबत गावातील संबंधित भागात निर्बंध लागू करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी कुठेच झाली नसल्याचे आढळून आले.
अशा आहेत उपाययाेजना
४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ६१ गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, असे भाग कन्टेनमेंट झोन करणार. गावात कोणालाही येण्यास व जाण्यास प्रतिबंध. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, वस्तू, विक्री, सेवा बंद. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई. कृषी माल वगळता इतर वाहनांना गावात बंदी.