Corona in Maharashtra: भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:42 PM2022-01-03T12:42:55+5:302022-01-03T12:49:47+5:30
Corona in Maharashtra: राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोनाने(Corona Virus) पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन झाले, त्यात काही नेत्यांसह अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातच आता भाजप नेते आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
ट्विटरवरुन दिली माहिती
अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुजय विखे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. याआधी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे.काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) January 3, 2022
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
आपल्या ट्विटमध्ये सुजय विखेंनी लिहिले की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोव्हिड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण
काही दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनातही कोरोनाने शिरकाव केला. राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.