कोरोना म्हणजे थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा आणि मंदिराची कुलुपं तोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:45 PM2021-07-12T15:45:43+5:302021-07-12T15:52:48+5:30
Sambhaji Bhide on Pandharput wari: पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं
सांगली: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची पुन्हा एकदा कोरोनाला(Corona) थोतांड असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाही राज्य सरकारने पंढरपूरच्या वारीवर(Pandharpur wari) बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर ते सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. 'कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे', असे संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही. लॉकडाऊन हा सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. इतक्यावरच न थांबता वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत, असेही भिडे म्हणाले.
वारी झाल्यानंतर कोरोना जाईल
कोरोनामुळे आज देशाची ही परिस्थिती झाली. पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली नसती, तर देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसता. माझं मत आहे की, देशात कोरोनाच्या नावाने मोठे षडयंत्र सुरू आहे, असे संभाजी भिडेंनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती.