काेराेना निगेटिव्ह, तरच राज्यात प्रवेश, देशभरातून येणाऱ्यांना नियम, दुधाच्या ‘होम डिलिव्हरी’ला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:40+5:302021-05-14T06:40:38+5:30
राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : संवेदनशील भागातून राज्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील, त्या सगळ्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय राज्यात येता येणार नाही.
राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ‘ब्रेक दी चेन’संबंधी १३ एप्रिल, २१ एप्रिल, २९ एप्रिल रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध आता १ जूनपर्यंत लागू राहतील. त्याव्यतिरिक्त आणखी काही निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर संनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवतील. जर अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाही, असे दिसून आल्यास त्या- त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल; परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
- मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनामध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लीनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल.
- जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील, तर त्यातील दोघांना आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासांपूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
कोणत्याही वाहनातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
कोविड व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्याची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेल्या विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.