corona virus-कोरोनाचा रूग्ण आढळलेले शृंगारतळी आयसोलेट, जिल्ह्यातील हॉटेल, बार, टपऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:46 PM2020-03-19T13:46:40+5:302020-03-19T13:49:38+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. तर पुढील दोन किलोमीटरचा परिसरसुद्धा बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यातील शृंगारतळी (ता. गुहागर) येथील ५० वर्षीय व्यक्तीचे कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रात्रीच तातडीने सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबतच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या कुटुंबियांनाही तपासणीसाठी घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात जेवढी लोक आली आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच शृंगारतळीच्या परिसरात अन्य कोणालाही फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील पालखी ग्रामप्रदक्षिणाही बंद करण्यात आली असून, त्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी गुरूवारपासूनच हॉटेल, बार, टपऱ्या बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच येत्या काही दिवसात जिल्ह्यातील एस्. टी. सेवा टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परदेशातून आलेल्या व्यक्तींनी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपविल्यास आणि त्यानंतर त्यांच्याबाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास त्यांच्यासह कुटुुंबियांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
रत्नागिरी कोरोना अलर्ट : जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा
▪कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हायातील हाॅटेल, बार, टपऱ्या होणार बंद
▪आजपासून केवळ जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद केली जाणार
▪जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची माहिती
▪येत्या काही दिवसात जिल्ह्यातील एसटी सेवा टप्याटप्याने बंद करणार
▪जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंद, बंदीचे उल्लघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार
▪परदेशातून आलेल्या व्यक्तींनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपुर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल करणार- जिल्हाधिकारी
▪पाॅझिटिव्ह आढळलेल्या गुहागरमधील शुंगारतळी इथली तीन किलोमिटरा परिसर आयसोलेट
▪तर पुढील दोन किलोमिटरचा परिसर सुद्धा बफरझोन म्हणून जाहिर
▪या परिसरात अन्य कोणालाही फिरता येणार नाही- जिल्हाधिकारी
▪गावातील पालखीच्या ग्रामप्रदक्षणेवर बंदी
▪उल्लघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार - जिल्हाधिकारी