राज्यात कोरोना सप्टेंबरमध्ये शिखरावर; तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:27 AM2020-07-26T04:27:33+5:302020-07-26T04:27:45+5:30
डॉ. मूर्ती । ही अवस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या काळात
हैदराबाद : देशात एकाच वेळी कोरोनाची साथ शिखराला पोहोचणे अशक्य आहे. ही अवस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी गाठली जाईल. दिल्लीमध्ये ती या महिन्यात किंवा ऑगस्टच्या प्रारंभी तर महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ही वेळ सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे असे हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे संचालक प्रा. जी. व्ही. एस. मूर्ती यांनी सांगितले.
प्रा. मूर्ती हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (एम्स) कम्युनिटी ऑप्थॅल्मॉलॉजी विभागाचे संस्थापक आहेत. ते या विभागाचे २०१० सालापर्यंत प्रमुख होते. ते म्हणाले, स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर झारखंड राज्यामध्ये कोरोना साथीचा फैलाव सुरू झाला होता. तेथे कोरोना साथीला शिखर गाठण्यास अजून काही काळ लागेल. प्रत्येक राज्यात किती लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यावर साथीचा सर्वोच्च फैलाव अवलंबून आहे. त्यामुळे देशात एकाच वेळी कोरोनाची साथ कळसाला पोहोचणे शक्य नाही. मुंबई, दिल्लीहून स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर बिहारमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली. या साथीसंदर्भात प्रत्येक राज्याची स्थिती निरनिराळी आहे.
प्रा. मूर्ती यांनी सांगितले, कोरोनाची साथ नियंत्रणात राखण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच लोकांनीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, थोड्या थोड्या वेळाने हात धुणे या गोष्टी केल्या पाहिजेत. झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग यासारख्या ठिकाणी कोरोनाची साथ सप्टेंबर किंवा आॅक्टोबरमध्ये शिखर गाठण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र, हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये ही वेळ सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकते.
फैलावाबाबत बेसावध न राहण्याचे आवाहन
आयआयपीएच या संस्थेचे संचालक प्रा. मूर्ती यांनी सांगितले की, काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर या साथीवर आपण काही प्रमाणात नियंत्रण मिळविले असे तेथील सरकारला वाटले होते. केरळसारख्या राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे असे वाटत असतानाच तिथे दहा दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या फैलावाबाबत कोणीही बेसावध राहू नये.