कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही!
By संतोष आंधळे | Published: December 20, 2023 09:56 PM2023-12-20T21:56:48+5:302023-12-20T21:57:59+5:30
गरजेच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
सतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा कोरोना आजाराच्या विषयाला घेऊन चर्चा सुरु झाली आहे. केरळमध्ये सापडलेल्या जे एन. १ या नवीन व्हेरियंटच्या पार्शवभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहान राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी मात्र घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्यात सध्याच्या घडीला एकूण कोरोनाचे एकूण ४५ सक्रिय रुग्ण असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तसेच बुधवारी राज्यात १४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई - ४, ठाणे मनपा -३ , रायगड -१, पुणे मनपा - ४, पिंपरी चिंचवड मनपा - २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
इन्फ्लुएंझा सारखे आजार आणि श्वसन विकाराचा गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सर्व जिल्ह्यांना कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहे.
सिंधूदुर्गात पहिला जे एन. १ चा रुग्ण
देशात जे एन. १ या व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. हा रुग्ण ७९ वर्षाची महिला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे. जे एन. १ हा ओमिक्रोन व्हेरियंटचा उपप्रकार असून , यामुळे रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यकता दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यांमध्ये नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण ( जीनोम सिक्वेसिंग ) करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यामध्ये एक जे एन . १ या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षाचा पुरुष आहे.