कोरोनाचा ९ जिल्ह्यांमध्ये पुन्हा फैलाव, आराेग्य विभागाचा त्रिसूत्री कृती कार्यक्रम, खबरदारीच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 02:38 AM2021-02-14T02:38:53+5:302021-02-14T06:41:25+5:30
CoronaVirus News In Maharashtra : टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यानंतर होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तर संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही राज्यातील नऊ जिल्ह्यांत अधिक असणाऱ्या पॉझिटिव्हीटी दराचे प्रमाण कमी कऱण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यांत विशेष लक्ष देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
याविषयी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. हा दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत सहवासितांचा शोध, निदान व चाचणी या माध्यमातून काम कऱण्यात येत आहे. तसेच, कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती, प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया हाताळण्यात येत आहेत.
नागपूर, सातारा आणि नाशिक येथे अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत बेफिकीर राहू नये. त्याकरिता या वर्षअखेरपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक आहे. सामान्यांनीही नियंत्रणात सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
राज्यात उद्यापासून देणार लसीचा दुसरा डोस
- देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याच्या टप्प्याला शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र महाराष्ट्रामध्ये सोमवार, १५ फेब्रुवारीपासून या टप्प्याला सुरूवात होणार आहे.
- १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला देशभरात प्रारंभ झाला. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी शनिवारी या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशभरात ७९६७६४७ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.