Corona RTPCR Test : राज्यात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी 350 रुपयांत, दर पुन्हा एकदा कमी, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:35 PM2021-12-06T21:35:04+5:302021-12-06T21:35:52+5:30

Corona RTPCR Test: आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

Corona RTPCR Test: Corona RTPCR test in the Maharashtra at Rs 350, rate reduced once again, decision of the state government | Corona RTPCR Test : राज्यात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी 350 रुपयांत, दर पुन्हा एकदा कमी, राज्य सरकारचा निर्णय

Corona RTPCR Test : राज्यात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी 350 रुपयांत, दर पुन्हा एकदा कमी, राज्य सरकारचा निर्णय

Next

मुंबई : डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर आज मुंबईत आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 10 वर गेला आहे. यातच आता राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत.  कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 350 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 500 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 700 रुपये आकारण्यात येणार आहेत. 

राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. 

अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 300, 400 आणि 500 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी 1200 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसंच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

Web Title: Corona RTPCR Test: Corona RTPCR test in the Maharashtra at Rs 350, rate reduced once again, decision of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.