एसटीच्या ‘एसी’ प्रवासाला कोरोनाची खीळ ; अडीच महिन्यांत १५ ते २५ कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 09:19 PM2020-06-11T21:19:15+5:302020-06-12T12:01:57+5:30

देशात लॉकडाऊन झाल्यापासून एसटीची एकही एसी बस मार्गावर धावलेली नाही.

Corona stop to ST’s ‘AC’ journey; 15 to 25 crore loss in lockdown | एसटीच्या ‘एसी’ प्रवासाला कोरोनाची खीळ ; अडीच महिन्यांत १५ ते २५ कोटींचा फटका

एसटीच्या ‘एसी’ प्रवासाला कोरोनाची खीळ ; अडीच महिन्यांत १५ ते २५ कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देलाखो परप्रांतीय प्रवाशांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यामध्ये एसटीची महत्त्वाची भूमिकाप्रवाशांना एसी बसमधून प्रवासासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणाररेड झोन वगळता राज्यात अन्य ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू

राजानंद मोरे 

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील वातानुकूलित (एसी) व आरामदायी शिवनेरी व शिवशाही बस मार्गावर आणणे सध्यातरी शक्य नाही; तसेच रेड झोन वगळता अन्य भागात एसटी बस सुरू असल्या, तरी त्यामध्ये एसी बसचा समावेश करण्यात आलेला नाही. पुढील काही दिवसांत जिल्हांतर्गत सेवा सुरू झाली, तरी एसी बस लगेच मार्गावर आणल्या जाणार नाहीत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना एसी बसमधून प्रवासासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे.
देशात लॉकडाऊन झाल्यापासून एसटीची एकही एसी बस मार्गावर धावलेली नाही. लॉकडाऊननंतर लाखो परप्रांतीय प्रवाशांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यामध्ये एसटीची महत्त्वाची भूमिका आहे. पण, त्यासाठीही साध्याच बस वापरण्यात आल्या. तसेच, रेड झोन वगळता राज्यात अन्य ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, त्यामध्येही एसी बस नाही. सध्या एसटीच्या ताफ्यात ९७० शिवशाही व ११५ शिवनेरी बस आहेत. शिवनेरी बस या प्रामुख्याने पुणे व मुंबईमध्येच आहे. तर, शिवशाही गाड्या राज्यांच्या विविध भागात धावतात. या बसला प्रवाशांकडून पसंतीही मिळत होती. पुणे-मुंबईदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेपाठोपाठ शिवनेरी बसला अधिक प्राधान्य दिले जात होते. पण, कोरोनामुळे या बस मार्गावर येण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
एसी यंत्रणेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाकडूनच त्याचा वापर कमी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या एसी बस लवकर मार्गावर येणे अशक्य आहे. याबाबत राज्यातील आगारांनाही सूचना देण्यात आल्याचे समजते.
-----------
एसीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सध्या आपण या बस मार्गावर आणण्याचे टाळले आहे. तसेच, सध्या ग्रामीण भाग व रेड झोन वगळून इतर भागातच बस सुरू आहेत. तिथे एसी बसची फारशी आवश्यकता नाही. पुणे, मुंबई किंवा जिल्हांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर, या बस सुरू करण्याबाबत सांगता येणार नाही. त्यावेळी याचा विचार होईल.  
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
-----------------
पुणे-मुंबईला फटका
एसटीच्या शिवनेरी बस प्रामुख्याने पुणे व मुंबईदरम्यान धावतात. पुण्यातून स्वारगेट, पुणे, स्टेशन व शिवाजीनगर येथून दादर, ठाणे, बोरीवलीला या गाड्या जातात. स्वारगेट स्थानकातून दररोज जवळपास ८० ते ९० फेऱ्या होतात. प्रत्येक बसमागे २० ते ३० हजार उत्पन्न मिळते. तर, पुणे स्टेशन येथू दादरसाठी जवळपास १०० फेऱ्या होता. औरंगाबादसाठीही सुमारे २० फेऱ्या होतात. त्यातून ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. केवळ पुणे-मुंबई मार्गावरच शिवनेरीचे सरासरी २० ते ३० लाख रुपये उत्पन्न मिळते. लॉकडाऊनमध्ये मागील अडीच महिन्यांत एसटीचा १५ ते २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

Web Title: Corona stop to ST’s ‘AC’ journey; 15 to 25 crore loss in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.