कोरोना, सारी साथीच्या संकटात राजकीय पातळीवर अनास्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:30 AM2020-04-13T03:30:11+5:302020-04-13T03:30:52+5:30
औरंगाबादच्या पालकमंत्र्यांची अनुपस्थिती : उपाययोजनांमध्ये इतर मंत्रीही निवांत
औरंगाबाद : कोरोना विषाणूचे संकट थोपविण्यासाठी राज्य शासन निर्णय घेत असतानाच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री बैठका घेऊन आदेश देत आहेत. मात्र औरंगाबादेत सारी आणि कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असताना पालकमंत्री सुभाष देसाई मुंबईत आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील दोन मंत्र्यांपैकी राज्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. इतर लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघात उपाययोजना आणि मदतीमध्ये गुंतले असून, जिल्हास्तरावर एकमुखी नेतृत्वाची अनास्था असल्याचे समोर आले. त्यामुळे तुटवडा असलेल्या वस्तू मिळविण्यासाठी राजकीय पाठबळाच्या अभावी संघर्ष करावा लागत आहे.
औरंगाबाद शहरात ‘कोरोना’चा एक मृत्यू आणि सारी आजाराने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला असताना या प्रश्नावर उपाययोजनेसंदर्भात पालकमंत्र्यांपासून इतर मंत्री आणि सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांमध्ये अनास्थाच दिसत आहे. शहरात सारीची लागण झालेल्या संशयितांचा आकडा १६८ एवढा आहे. त्याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० वर पोहोचली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. या संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाउनची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका टोळक्याने पोलिसांना मारहाण केली.
याशिवाय घाटी रुग्णालयात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचा तुटवडा असल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले. लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी लोक पोलिसांना जुमानत नसल्याचे दिसते. या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांना भूमिका बजावता आलेली नाही. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने ते तिकडे व्यस्त असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकदाही आढावा घेतला नसल्याची माहिती आहे. पालकमंत्र्यांनी मागील महिनाभरात औरंगाबादचा दौरा केलेला नाही किंवा शासनाच्या वतीने अब्दुल सत्तार किंवा संदिपान भुमरे या दोन मंत्र्यांनाही त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना नाहीत. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असलेले संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण मतदारसंघातच अडकले आहेत.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेऊन काही सूचना केल्या. शिवाय ते धुळ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र औरंगाबादच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय पातळीवर पावले उचलली गेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
काही मंत्री सक्रिय
नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, बीडमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत परिस्थिती हाताळत आहेत. औरंगाबादेत सर्वाधिक रुग्ण असतानाही राज्य शासनाकडून पाहिजे तेवढी दखल घेण्यात येत नसल्याचेही समोर येत आहे. याविषयी सुभाष देसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांना मेसेज पाठविला असता प्रतिसाद मिळाला नाही.