Corona Vaccination: लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांत महाराष्ट्र पहिला - टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:59 AM2021-10-22T07:59:33+5:302021-10-22T08:00:04+5:30
आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई : देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी लसीकरण झाले आहे. आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
देशाने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे म्हणाले की, १५ ऑक्टोबरपर्यंत शंभर कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले होते. हे लक्ष्य आज पूर्ण करण्यात आले. शंभर कोटींचा टप्पा पार पडला. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यातील एकूण लसीकरणापैकी ६ कोटी ४० लाखजणांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या साधारण ३० टक्के असून, एकूण २ कोटी ९० लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची राज्याची टक्केवारी देशात सर्वाधिक आहे, तर, सर्वाधिक पहिला डोस घेणाऱ्यांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या अधिक असल्याने तिथे लसींचा आकडा तुलनेत जास्त होता, असेही राजेश टोपे म्हणाले. राष्ट्रीय लसीकरणात महाराष्ट्राची चांगली कामगिरी आहे. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे टोपे यांनी अभिनंदन केले.
जागतिक टक्केवारीत मागेच - मिलिंद देवरा
लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबविणे सोपी गोष्ट नाही. पण आतापर्यंत केवळ २१ टक्के भारतीयांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. जागतिक टक्केवारी ३७ टक्के आहे. त्यामुळे आताच उत्सव साजरा करून महामारी संपल्याचा आभास निर्माण करता कामा नये, असे मिलिंद देवरा म्हणाले.