Corona Vaccination: ४० लाख डोस हवेत, देणार फक्त १७ लाख- राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 03:37 AM2021-04-09T03:37:08+5:302021-04-09T07:18:45+5:30
केंद्राकडून गुरुवारी फक्त १७ लाख ४३ हजार डोस पाठविण्यात येतील, असे कळवल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र, त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून गुरुवारी फक्त १७ लाख ४३ हजार डोस पाठविण्यात येतील, असे कळवल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के सक्रिय रुग्ण असून महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे, असे सांगून टोपे म्हणाले, लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र शासनासोबत वादविवादाचा विषय नाही. मात्र, ६ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या १७ हजार सक्रिय रुग्ण असताना गुजरातला लसीचे १ कोटी डोस देण्यात आले. गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे साडेचार लाख सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही १ कोटी ४ लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे ९ लाख डोस शिल्लक आहेत.
महाराष्ट्रात केंद्राच्या नियमाप्रमाणेच चाचण्या
अनेक विकसित देशांनी १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन १८ ते ४० वयोगटाला लसीकरणाची गरज आहे. ७०:३० या प्रमाणात ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या राज्यात होत आहेत, असे ते म्हणाले.