Corona Vaccination: कोरोना बळींची संख्या वाढतीच; लसीकरणावरही मोठ्या मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:51 AM2021-04-08T02:51:39+5:302021-04-08T07:36:10+5:30
लसींचा साठाच नियंत्रित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लसीकरणाच्या वेगावरही काहीशा मर्यादा आल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्रात विशेषत: नाशिक, धुळे आणि नगर जिल्ह्यांत कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत कमालीच्या वेगाने भर पडत आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटरच्या वापराबाबत अनास्था दिसत आहे. दुसरीकडे लसींचा साठाच नियंत्रित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लसीकरणाच्या वेगावरही काहीशा मर्यादा आल्या आहेत.
धुळे- आठवडाभरात २६ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. दररोज सरासरी ४०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बाधित रुग्णांची संख्या २८ हजार ८३३ इतकी झाली आहे. आतापर्यंत २३ हजार ९७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल ते ६ एप्रिल या कालावधीत २ हजार २७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नंदुरबार- सहा दिवसांत ६४ जणांचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोनाने ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर १.९० टक्के आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजार ८२८ आहे. सहा दिवसांत नवीन तीन हजार ६६१ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण तपासणीच्या हा ३५ टक्के पाॅझिटीव्हिटी दर आहे.
नाशिक- आठवडाभरात दीडशेवर बळी
एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत कमालीच्या वेगाने भर पडत आहे. दिवसाला सरासरी ४ ते ५ हजार बाधित होत आहेत. मंगळवारी तर कोरोना बळींचा ३२ इतका उच्चांक नोंदला गेला. अवघ्या आठवडाभरात १५० हून अधिक बळी, ही स्थिती झाल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये नाशिकदेखील अव्वल पाचात पोहोचले आहे.
जळगाव- १३००पेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजनवर
एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या सहा दिवसांत कोरोनाचा सर्वाधिक फटका जळगाव शहर आणि चोपडा तालुक्याला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही ठिकाणी कोरोनाचे अडीचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील या दोन ठिकाणांशिवाय फक्त भुसावळ तालुक्यात जास्त आहे.सध्या चोपडा तालुक्यात २५६० रुग्ण उपचार घेत आहेत, तर जळगाव शहरात २५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर- ११ हजार सक्रिय रुग्ण
अहमदनगर जिल्ह्यात सध्या ११ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या पाच दिवसांत १५ हजारांच्या जवळपास जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या रोज सरासरी १६७० रुग्ण बाधित होत आहेत. गेल्या आठ दिवसांत १३,३७४ रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात रोज पाचशे जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.
सध्या उपचार घेत असलेले
शहर २५०७
ग्रामीण ३७६
भुसावळ १०००
चोपडा २५६०
धरणगाव ५०४
भडगाव ४२५
चाळीसगाव ४७४
भुसावळ : १ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६ एप्रिलला उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३१२ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर आयसीयूमध्ये दाखल रुग्ण ५५७ आहेत. ऑक्सिजनवर असलेले १३१२ व आयसीयूत असलेले ५५७ रुग्ण ही गेल्या वर्षातील सर्वोच्च आकडेवारी आहे.
गंभीर रुग्णांसोबत मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या सहा दिवसांत ८७ मृत्यू झाले. ११,६४६ रुग्णांपैकी लक्षणे असलेले रुग्ण हे २६२१ आहेत, तर लक्षणे नसलेले रुग्ण हे ९,०२५ आहेत.