Corona Vaccination : राज्यात ९ लाख ४६ हजार जणांचे विक्रमी लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:59 AM2021-08-15T05:59:56+5:302021-08-15T06:00:31+5:30
Corona Vaccination : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते.
मुंबई : महाराष्ट्राने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लसीकरणाचा नवा विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी आठ वाजेपर्यंत ९ लाख ४६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान १० लाख लसीकरणाची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. दिवसभरात मुंबई १,५१,२५ जणांना पुण्यामध्ये ९७,१०५, ठाण्यात ९१,३६८, नागपुरात ५९,८०९, नाशकात ५४,२७५ जणांना लस देण्यात आली.