Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:06 AM2021-08-27T08:06:57+5:302021-08-27T08:07:33+5:30
Corona Vaccination two dose gap: दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत आहेत.
- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे शहर-उपनगरातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, मात्र हे लोक दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत असताना या डोसला विलंब झाल्यास हरकत नाही, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टीम तयार करतो व विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार करायला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ लागेल तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते. लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्या बाबतीत फायदेशीर ठरते.
कोविशिल्डचा तुटवडा अधिक
मुंबई पालिकेकडून कोविशिल्ड ही लस अधिक दिली जाते. त्यामुळे या लसीच्या डोसचा तुटवडा सातत्याने जाणवतो. कोव्हॅक्सिन या लसीचा साठा मर्यादित असतो. तर स्पुतनिक ही लस पालिकेकडे नाही. पालिकेच्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक खंड हा कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
लोकांनी संयम राखावा
लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे हे खरे आहे. मात्र कोणत्याही कारणास्तव दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास घाबरून जाऊ नये. एखादा आठवडा वगैरे उशीर झाल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे लोकांनी संयम राखावा.
लसीच्या साठ्याचा पुरवठा नियमित होण्यासाठी केंद्राकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे, याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे, असे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.