Corona Vaccination : राज्यात दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोसपासून वंचित; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:41 AM2021-10-26T07:41:43+5:302021-10-26T07:42:11+5:30
Corona Vaccination : राज्यात नुकतीच या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने विशेष लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. याविषयी कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया सुलभ नाही.
मुंबई : राज्यात अजूनही १८ ते ४४ वयोगटातील २.२१ कोटी लाभार्थी कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. ठाणे जिल्ह्यात या वयोगटातील लस न घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, हे प्रमाण १५.३ लाख इतके आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये १४.१ लाख आणि औरंगाबादमधील १०.८ लाख लाभार्थ्यांनी अजूनही लसीचा पहिला डोस घेतला नसल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
राज्यात नुकतीच या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने विशेष लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. याविषयी कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया सुलभ नाही. या वयोगटात दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण गंभीर होते.
त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहणे योग्य नाही.’ या वयोगटातील लाभार्थी बाहेर फिरतात, प्रवास करतात. त्यामुळे संसर्ग प्रसारक ठरण्याचा धोका आहे. परिणामी, लसीकरण हाच उपयुक्त मार्ग आहे, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली.
युद्धपातळीवर लसीकरण
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व्यापक प्रमाणावर लसीकरण व्हावे, यासाठी राज्य सरकारने जोमाने तयारी सुरू केली आहे. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ४० लाख विद्यार्थ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचा डेटा आरोग्य विभागाला उपलब्ध करून द्यायचा आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी
डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.