Corona Vaccination: १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण नाही; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:47 PM2021-04-28T15:47:03+5:302021-04-28T15:48:26+5:30
Corona Vaccination: १८ ते ४४ वर्ष वयोगटाला मोफत लस मिळणार; पण १ मेपासून लसीकरणास सुरुवात नाही
मुंबई: राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मेपासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली.
कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली.
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील कोरोना लसीकरण ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मेपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र इच्छा असतानाही आम्हाला हे लसीकरण सुरू करता येत नसल्याचं टोपेंनी सांगितलं. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रं सुरू केली जातील. ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी १८ ते ४४ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
टप्पे आखले जाणार?
१८ ते ४५ वर्षे वयोगटाचं लसीकरण करण्यासाठी लवकरच संपूर्ण नियोजन केलं जाईल. यासाठी १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ असे तीन गट करण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायचं का याबद्दलही विचार सुरू आहे. नागरिकांनी कोविन ऍपवर नोंदणी करून आणि अपॉईंटमेंट घेऊनच लस घेण्यासाठी केंद्रावर यावं. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.