Corona Vaccination: चिंताजनक! राज्यात ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:35 AM2021-11-30T05:35:01+5:302021-11-30T05:35:28+5:30
Corona Vaccination in Maharashtra: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यात दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण ७ लाख ६० हजार ९५५, ऑक्टोबर महिन्यात ५ लाख २५ हजार १२१ वर तर नोव्हेंबर महिन्यात ४ लाख ६३ हजार ३८९ वर आले आहे. राज्यात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि लसीचा डोस चुकलेल्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुमारे ७० हजार आशा सेविका कार्यरत आहेत. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, लसीच्या पहिल्या डोसमुळे नक्कीच संरक्षण मिळते; मात्र दुसरा डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे आजार गंभीर स्थितीला जात नाही. शिवाय, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अत्यल्प असते.
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. दिवाळीनंतर लसीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानेही काही लाभार्थी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, मात्र ही धोक्याची घंटा ठरू शकते. सध्या म्युटेशनमुळे नव्याने धडकलेल्या ओमायक्रॉनचा धोका असताना लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे.
आदिवासीबहुल जिल्ह्यांत लसीकरण कमी
पालघर, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची संख्या कमी आहे. राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. अकोला, नंदुरबार, बीड आणि अमरावतीत पहिल्या डोससह केवळ ५५ टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. काही समुदायांमध्ये लसीबाबत संकोच आहे. यासाठी पुढाकार घेत कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.