CoronaVirus News : कोरोनावर भारतात लवकरच लस विकसित होणार?; 30 माकडांवर प्रयोग करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:57 PM2020-06-02T22:57:22+5:302020-06-02T23:31:02+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
मुंबई : कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून, ठाकरे सरकारकडून कोरोनावर औषध तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतूनच देण्यात येणार असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
सध्या राज्यात कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा
लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल
Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ