Corona Vaccine: मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीतच एकवाक्यता नाही: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 04:35 PM2021-04-26T16:35:47+5:302021-04-26T16:37:57+5:30
Corona Vaccine: भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पाही १ मेपासून सुरू करण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आली असताना, महाराष्ट्र सरकारनेही याबाबतची घोषणा करण्यात आली. मात्र, यावरून आता हळूहळू राजकारण तापताना दिसत आहे. भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मोफत लसीकरणाबाबतची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis criticised maha vikas aghadi govt over free vacciation)
कुठले धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही. मात्र, लसीकरणाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईतील अंधेरीमध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख
राज्यांवर याचा भार नाही
मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरिता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा
महाविकास आघाडीने एकवाक्यता ठेवायला पाहिजे. जे बोलघेवडे लोक आहेत, जे सातत्याने केंद्र सरकावर बोलतात त्यांना सांगू इच्छितो, इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून इतर सामुग्री महाराष्ट्रात पोहोचवली जात आहे. कांगावेखोरांना माझी विनंती आहे की लोक दु:खात आहेत, या प्रसंगी केंद्र सरकार मदत करत आहे. राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.
लॉकडाऊन करा; कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाहीस्नानाबाबत मागणी, आखाड्यांची मात्र तयारी
दरम्यान, राज्यात सरसकट मोफत कोरोनाची लस द्यायची का याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी, याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल, त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांनी मांडली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लसीकरणासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणाच केली होती. परंतु, कालांतराने आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचे ट्विट डिलीट केले.