Corona vaccine : कोरोनाची लस घ्या अन् प्रमाणपत्र जपून ठेवा! आरोग्य विमा, पासपोर्टसाठी आवश्यक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:01 PM2021-03-14T18:01:11+5:302021-03-14T18:02:30+5:30
Corona vaccine: आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करीत आहेत.
यवतमाळ : सध्या कोरोनाची लस घेण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. मात्र लस घेतल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र पुढील काळात अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रांमध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करीत आहेत. मात्र लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोच पावती जपून ठेवण्याचीही गरज आहे.
कारण नजिकच्या भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. असे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा विम्याच्या प्रिमियमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील १३ आकडी संदर्भ क्रमांक जवळ बाळगणे फायद्याचे ठरू शकणार आहे. तसेच पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी, आंतरराज्यीय प्रवासासाठीही या प्रमाणपत्राची विचारणा होऊ शकते. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदीच्या वेळीही कोरेाना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे.
अधिकारी म्हणतात...
यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनीही दुजोरा दिला. विशेषत: खासगी विमा कंपन्यांकडून मेडिक्लेम पाॅलिसींकरिता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मागितले जाणार आहे. तर एलआयसीच्या जीवनआरोग्य विम्यासाठीही ते गरजेचे ठरणार आहे, असे एलआयसीच्या मार्केटिंग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे म्हणाले की, याअनुषंगाने लाभार्थ्यांकडून एक फाॅर्म भरून घेतला जातो. त्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्र हे कम्पलसरी केलेले नाही. परंतु, आमच्या गाइडलाइन दर आठवड्याला बदलतात. यापुढे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.