Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

By अतुल कुलकर्णी | Published: June 3, 2021 07:52 AM2021-06-03T07:52:33+5:302021-06-03T07:53:12+5:30

Corona Vaccine: सुरुवातीच्या काळात महिन्याला ५ लाखापासून ५० लाखापर्यंत लसीचे डोसे तयार केले जातील. हळूहळू उत्पादन एक वर्षात २२ ते २३ कोटी पर्यंत नेले जाईल. मात्र त्यासाठी एवढे उत्पादन होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

Corona Vaccine haffkine institutes vaccine will come in the market next year | Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

Corona Vaccine: हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : पोलिओची लस बनवण्यासाठी नावलौकिक मिळवणार्‍या हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये, कोरोनावरील लस तयार होण्यासाठी किमान आठ ते नऊ महिने लागतील. सध्या या ठिकाणी लस बनवण्याकरता अत्यावश्यक बांधकाम सुरू असून लागणारी उपकरणे आणि वेगवेगळ्या परवानग्या यासाठी वेळ लागणार आहे. भारत बायोटेक सोबत हापकिन मध्ये कोव्हॅक्सिन लस बनवण्याचे काम सुरू करणार आहे.

सध्या बायोसेफ्टी लॅब तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच पुढील कामे केली जातील. या प्रकल्पाकरिता आठ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. तो कमीत कमी कसा करता येईल यासाठी आपले प्रयत्न असल्याचे, हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी लोकमतला सांगितले. सुरुवातीच्या काळात महिन्याला ५ लाखापासून ५० लाखापर्यंत लसीचे डोसे तयार केले जातील. हळूहळू उत्पादन एक वर्षात २२ ते २३ कोटी पर्यंत नेले जाईल. मात्र त्यासाठी एवढे उत्पादन होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिनला केंद्र सरकारकडून ६५ कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून ९४ कोटी रुपयांचे अनुदान दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्र सरकारने वेगवेगळ्या कंपन्यांना लसीचे उत्पादन सुरू करण्यास परवानगी देणे सुरु केले आहे. त्याशिवाय परदेशातील लसी भारतात विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया देशपातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बाहेरून लस भारतात येऊ लागली तर भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्या लसी सध्या ज्या किंमतीला मिळत आहेत ती किंमत त्यांना कमी करावी लागेल. त्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय उरणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र त्यासाठी केंद्राकडून वेगाने हालचाली अपेक्षित असल्याचेही ते अधिकारी म्हणाले.

हाफकिन मध्ये तयार होणाऱ्या लसीचा उत्पादन खर्च २० ते ५० रुपयाच्या आत असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. लसीची नेमकी किंमत किती असावी? अंतिम उत्पादन खर्च किती होईल? यावर सध्या अभ्यास सुरू आहे. पण जी किंमत सध्या सांगितली जात आहे, सध्या उपलब्ध लसींची जी किंमत आहे त्यापेक्षा कितीतरी कमी किंमत हापकिन मध्ये तयार होणाऱ्या लसीची असू शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. तर प्रत्यक्षात उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यावेळी जे दर असतील त्यानुसार एका लसीचा उत्पादन खर्च किती असेल हे काढता येईल असे डॉ. राठोड म्हणाले.

सुरुवातीला रोज २५ हजार लसी तयार केल्या जातील, असा प्राथमिक अंदाज आहे. यंत्रणेत वाढ करून जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, किमान सहा ते आठ महिने हाफकिन मधून लसीचे पूर्ण उत्पादन सुरु होण्यासाठी लागतील. 

एक विभाग, तीन मंत्री, दोन सचिव
हापकिनकडे राज्यातील औषध खरेदीचे काम देण्यात आले आहे. हापकिन इन्स्टिट्यूट अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते. तर औषध खरेदी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुचवली जाते. वैद्यकीय शिक्षण विभागही स्वतःची खरेदी हाफकिनकडून करतो. त्यामुळे या विभागाला तीन मंत्री आणि दोन सचिव असले तरी विभागात पुरवठा दरांची बिल देण्यावरून काही बाहेरचे लोक पुरवठादारावर दबाव आणण्याचे काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. हे लोक कोणत्या मंत्र्याच्या अधिकाऱ्याच्या जवळचे आहेत यावरून पुरवठादारांमध्येही चर्चा जोरात आहे. आपण या विभागात प्रतिनियुक्तीवर आलो आहोत त्यामुळे या विषयी माहिती घेऊन आपण सांगू असे डॉ. राठोड म्हणाले.

Web Title: Corona Vaccine haffkine institutes vaccine will come in the market next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.