CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 03:33 PM2020-07-23T15:33:42+5:302020-07-23T15:44:32+5:30
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना लसीच्या चाचणीतून समाधानकारक परिणाम मिळत आहेत. ऑक्सफर्डने या लसीच्या उत्पादनासाठी भारतातील एसआयआयची निवड केली आहे.
पुणे - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. ही चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई आणि पुण्याच्या हॉटस्पॉट भागांतील तब्बल 4 ते 5 हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्व काही व्यवस्थित राहिले, तर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत लस लॉन्च करण्यात येईल, अशी आशा लसीचे स्थानीय उत्पादक सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) व्यक्त केली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना लसीच्या चाचणीतून समाधानकारक परिणाम मिळत आहेत. ऑक्सफर्डने या लसीच्या उत्पादनासाठी भारतातील एसआयआयची निवड केली आहे.
लसीच्या चाचणीसाठी मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉटची निवड -
पुण्यात बुधवारपर्यंत तब्बल 59,000 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखच्याही वर पोहोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण केवळ या दोन शहरांतीलच आहेत. एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले, 'लसीच्या चाचणीसाठी आम्ही मुंबई आणि पुण्यात काही जागा निश्चित केल्या आहेत. या शहरांत कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत. यामुळे आम्हाला लस किती प्रभावशाली आहे, याचे आकलन करण्यास मदत होईल.'
परवानगी मिळताच चाचणीला सुरुवात -
एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले, भारतीय औषध नियंत्रकांकडून परवानगी मिळताच ऑगस्टमध्ये लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल. कंपनी चाचणी सुरू करण्यासाठी दोन दिवसांच्या आत औषध नियंत्रकांकडे लायसंन्ससाठी अर्ज करेल. तेथून एक ते दोन आठवड्यांत मंजुरी मेळेल अशी आशा आहे. यानंतर साधारणपणे तीन आठवडे स्वयंसेवकांना रुग्णालयांत आणण्यासाठी लागतील. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यांत चाचणीला सुरुवात होईल, अशी आशा आहे.
भारतात किती रुपयांना मिळेल ही लस-
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India CEO Adar Poonawalla) अदार पुनावाला यांनी सांगितले की संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीची किंमत कमी ठेवण्यात येणार आहे. भारतात कोरोना लसीची किंमत १००० रुपये किंवा त्यांपेक्षा कमी असेल.