कोरोना व्हायरस; राज्यात तिघे निरीक्षणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:56 AM2020-02-12T05:56:14+5:302020-02-12T05:56:45+5:30

सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले.

Corona virus; All three are under observation in the state | कोरोना व्हायरस; राज्यात तिघे निरीक्षणाखाली

कोरोना व्हायरस; राज्यात तिघे निरीक्षणाखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असून उर्वरित दोघांचे प्रयोगशाळा अहवाल बुधवारपर्यंत मिळतील. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एक मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २५ हजार ७८२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून आलेल्या एकूण १६७ प्रवाशांपैकी ८४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जेएनपीटी बंदरात चीनच्या जहाजातील ‘क्रू ’ मेंबर्सना उतरण्यास मनाई
उरण : कोरोना व्हायरसने चीनमध्ये कहर माजविल्यानंतर खबरदारी म्हणून १५ जानेवारीनंतर चीनमधून येणाऱ्या जहाजातील ‘क्रू ’ मेंबर्सना जेएनपीटी बंदरात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तपासणीत कोरोना व्हायरसबाधित एकही संशयित रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही, अशी माहिती जेएनपीटी बंदराचे डेप्युटी कॉन्झेवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली. यामुळे जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, बंदरातील सर्वात मोठ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलवर कोरोना व्हायरसचा व्यापारावर परिणाम दिसून येत आहे. कारण बंदरात मालवाहू जहाजांची ये-जा रोडावल्याने बंदर सुनसान झाले आहे. मात्र, चीनमधून मालवाहू जहाजे नियमितपणे येत असल्याचा दावा बीएमसीटी बंंदराचे एचओडी अवधूत सावंत यांनी केला आहे. मात्र, कोरोना व्हायरसचा काहीसा परिणाम बीपीसीटीवर झाल्याचेही सावंत यांनी मान्य केले आहे.

Web Title: Corona virus; All three are under observation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.