Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:03 PM2020-04-14T20:03:36+5:302020-04-14T20:24:23+5:30

कोरोना संसर्गाची साखळी लगेच तुटणार नाही. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येण्यास लॉकडाऊनमुळे मदत होणार

Corona virus : Although the lockdown period is extended, it is currently difficult to completely break the chain of Corona | Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण

Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण

Next
ठळक मुद्देभारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीला प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना सातत्याने प्रयत्नशील राहणे तसेच नागरिकांनी यापुढील काळातही स्वच्छतेला महत्व देणेबाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना लक्षणे नसताना चाचणी केल्यास ती येऊ शकते निगेटिव्ह

पुणे : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविला असला तरी ही साखळी पुर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. पण जोपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत आहेत, तोपर्यंत धोका टळलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी योग्य असली तरी काही भागात तेथील संसर्गाची स्थिती पाहून ती शिथीलही करता येऊ शकत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच एकदा कोरोना झालेल्या किंवा अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो. त्यामुळे नवीन व्यक्तीला संसर्ग होणार नाही, यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहणे तसेच नागरिकांनी यापुढील काळातही स्वच्छतेला महत्व देणे, हे खरे आव्हान असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीला प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर एकदिवसाची जनता संचारबंदी करून लॉकडाऊनचे संकेत दिले गेले. तर दि. २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण या कालावधीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. लॉकडाऊनमुळे इतर देशांच्या तुलनेत हा आकडा मर्यादित राहिला, हेही मान्य करावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याबद्दल भारताचे कौतुक केले. पण त्याचवेळी लॉकडाऊन अवेळी उठविल्यास ही महामारी उलटूही शकते, असा इशाराही दिला. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा कालावधी दि. ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. हा लॉकडाऊन १९ दिवसांचा असेल. म्हणजे एकुण लॉकडाऊनचे ४० दिवस होतात. त्यानंतरचा निर्णयही बाधित रुग्णांचा आलेख पाहून घेतला जाईल. पण या ४० दिवसांनंतरही आपण कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
देशपातळीवरील विषाणु प्रयोगशाळेतील एका शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे लोकांचा संपर्क कमी झाला आहे. कार्यालये, दुकाने, उद्योग, व्यवसाय, प्रवास बंद आहे. त्यामुळे वेगाने नवीन संसर्ग होत नाही. पण अनेक लोकांमध्ये लक्षणे नसली तरी त्यांना संसर्ग झालेला असू शकतो. त्यांच्यामुळे कुटूंबाला किंवा बाहेर इतरांनाही धोका आहेच. पण हे कमी प्रमाणात होईल. अनेकांना पुढील काही दिवसांत त्यांना लक्षणे दिसणारही नाही. पण लॉकडाऊननंतर लक्षणे दिसू शकतात किंवा त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची साखळी पुर्ण तुटणार नाही. पण ससंर्गची पातळी मात्र निश्चितच कमी होईल. त्यानुसार विशिष्ट भागातील कोरोनाची पातळी पाहून, तेथील किती लोकांना संसर्ग झाला आहे, किती बरे झाले आहेत, याची चाचपणी करून संचारबंदीचे नियम शिथील करता येऊ शकतात.
-----------
कोरोना संसर्गाची साखळी लगेच तुटणार नाही. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येण्यास लॉकडाऊनमुळे मदत होणार आहे. पुढील स्थिती पाहून लॉकडाऊनचे दिवस कमी करणे किंवा शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कोणतीही साथ पुर्णपणे जात नाही. अधूनमधुन विविध देशांमध्ये साथ येऊन जाते. पण जर कोरोनाबाधिताचा प्रत्येक संपर्क शोधून विलग केल्यास देशांतर्गत कोरोनाची साखळी तोडता येऊ शकते. व्यक्तीमध्ये नसलेला कोरोना विषाणु काही कालावधीने नष्ट होतो. पण त्यासाठी बराच काळ जावा लागेल.
- डॉ. अविनाश भोंडवे,अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
-----------
कोणताही विषाणु किती काळ राहील, हे कोणीच सांगु शकत नाही. २००२ मध्ये आलेला सार्स एक वषार्नंतर गायब झाला. एच ५ एन १ ची साथही दोन वर्षांनी गेली. पण २००९ मध्ये आपल्याकडे आलेला स्वाईन फ्लू आजही टिकून आहे. कोरोनाच्या बाबतीतही असे होऊ शकते.वेगवेगवेगळ्या विषाणुचे  वातावरणात राहण्याची क्षमता, संसगार्चा वेग वेगळा असतो. त्यामुळे तो कधी जाणार, हे सांगणे कठीण असते.
- डॉ. अखिलेश मिश्रा, माजी संचालक, राष्ट्रीय विषाणु संस्था
-------------
एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना लक्षणे नसताना चाचणी केल्यास ती निगेटिव्ह येऊ शकते. पण नंतर त्यांना संसर्ग होण्याचा धोका कायम आहे. तसेच एखादा पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर त्याला पुन्हा लागण झाल्याचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. त्यांची प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. पण प्रतिकारशक्ती कमी झाल्यास लागण होऊ शकते.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
-------------

Web Title: Corona virus : Although the lockdown period is extended, it is currently difficult to completely break the chain of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.