Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:22 AM2021-06-08T05:22:33+5:302021-06-08T05:22:56+5:30
Corona Virus : मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला.
मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविकांकडून मुख्यमंत्री म्हणून मला मोठी आशा आहे. आजवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातही त्यांची मोठी भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.
मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात. आपले तसेच अंगणवाडी सेविकांचे प्रश्न नक्कीच सोडविले जातील. मला थोडा वेळ द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. साथीच्या रोगांची लक्षणे आढळल्यास आशा सेविकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी.
कोरोनाव्यतिरिक्त कुपोषणाचे संकट आहे, त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे. राज्य शासनाच्या कोरोनामुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. तज्ज्ञांच्या मतांनुसार कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशाताईंची भूमिका महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका ऑनलाइन परिषदेत सहभागी झाल्या होत्या. मुरबाड येथील रोहिणी भोंदिवले, पातोंडा (जि. नंदुरबार) येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भूमिका बंजारी, हिंगोली येथील सुनीता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.