Corona virus : बाबासाहेबांची जयंती यंदा ऑनलाईन..! प्रबोधनासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:53 PM2020-04-11T17:53:10+5:302020-04-11T18:00:44+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात दरवर्षी धुमधडाक्यात साजरी होते..
धनाजी कांबळे -
पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात दरवर्षी धुमधडाक्यात साजरी होते. यंदा कोरोनामुळे देशात लॉकडाउन असल्याने जयंतीच्या कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत. मात्र, जयंतीची तयारी अनेक मंडळं, संस्था सहा महिन्यांपासून सुरु करतात. प्रबोधनासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते. यावर्षी घरोघरी आणि सोशल मीडियात धुमधडाक्यात जयंती साजरी होणार आहे.
राजाराणीच्या जोडीला...पाच मजली माडीला...आहे कुणाचं योगदानं...लाल दिव्याच्या गाडीला...या गाण्याची सध्या सोशल मीडियात जोरदार धूम सुरु असून, अनेकांनी व्यक्तीगत पातळीवर जयंती उत्सव सुरु देखील केला आहे. यंदा मिरवणुका, भव्य कार्यक्रम होणार नसले, तरी घराची सजावट, विद्युत रोषणाई केली जाणार आहे. दर वर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांना वंदन म्हणून १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. कोरोनामुळे हा उपक्रम वैयक्तिक पातळीवर करण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर आंबेडकरी शाहिरी जलसे होतील, फेसबुकवर लाइव्ह चर्चा होतील. मंडळांनी जमवलेला निधी विभागातील गरजू कष्टकरी, कामगार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. तसेच राज्य शासनाच्या सहायता निधीमध्ये देखील मदत देण्यात येणार आहे. कोरोना संशयितांच्या आयसोलेशनसाठी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विहार वापरण्यास देता येईल, असे संदेश फिरत आहेत. उत्सव बहुजन नायकांचा, जोतिबा-भीमरायांचा! असे ऑनलाइन जयंती विशेषचे कार्यक्रमही सुरु झालेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जागतिक ज्ञान दिवस म्हणूनही साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय प्रतिभेचा, ज्ञानाचा आणि बौद्धिक कौशल्याचा यशस्वी वापर करून राज्य सरकार आणि प्रांत सरकार यांना राष्ट्रीय धोरण स्वीकारण्यास भाग पाडले होते. आजच्या संकटाच्या काळात देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची गरज असताना बाबासाहेबांनी नियोजनासंदर्भात केलेले विवेचन अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचाही एक आराखडा जाणकार, तज्ज्ञांनी सरकारकडे द्यावा, अशी सूचना काही ज्येष्ठ विचारवंतांनी केली आहे. कोरोनाच्या संकटात बाबासाहेबांची वैज्ञानिक, विश्व करुणेची दृष्टी सर्व भेदभाव नष्ट करण्यास सध्याच्या परिस्थितीत जात-धर्म या पेक्षा मानव कल्याणास मार्गदर्शक ठरते, असेच उपक्रम राबवावेत, असेही आवाहन केले जात आहे.
.................................................................
घरोघरी साजरी करा जयंती.......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गावोगावी शोभायात्रा काढली जाते. त्यात हजारो अनुयायी सहभागी होतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वांनी घरीच जयंती साजरी करावी. तसेच घरोघरी जे करता येतील, ते उपक्रम करावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.