Corona virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:22 PM2022-06-01T19:22:56+5:302022-06-01T19:29:02+5:30
राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबई - राज्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये १ हजार ८१ नव्या कोरोना बाधितांचे निदान झाले. अर्थात राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा हजारचा आकडा ओलांडला आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी रुग्ण वाढ दिसून आली आहे. यापूर्वी, २७ फेब्रुवारी रोजी ७८२ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के -
आज एकूण ५२४ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७% एवढे झाले आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०९,५१,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८८,१६७ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४०३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज १०८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८८,१६७ वर पोहोचली आहे.