Corona Virus : महाराष्ट्रात मोठं थैमान घालणार कोरोना? जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकतात 80 लाख रुग्ण, 80 हजार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 12:56 AM2022-01-02T00:56:13+5:302022-01-02T00:56:53+5:30
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट प्राथमिक अवस्थेत असल्याचे डॉक्टर आणि तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना आणि आरोग्य अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, तिसर्या लाटेत कोविड-19 संसर्गाची संख्या मोठी होणार आहे. डॉ व्यास यांच्या पत्रात म्हटले आहे की, 'जर तिसऱ्या लाटेत 80 लाख कोरोना रुग्ण झाले आणि त्यात 1 टक्का मृत्यूचा अंदाज धरला, तरी 80 हजार मृत्यू होऊ शकतात.'
डॉ व्यास यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की ओमायक्रॉन व्हेरिअंटला हलक्यात घेऊ नका आणि कमी प्राणघातकही समजू नका. ज्यांचे लसीकरण झालेले नाही आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे, त्यांच्यासाठी हा व्हेरिअंटदेखील तेवढाच घातक आहे. यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत. व्यास यांच्या वतीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, ९,१७० कोरोना रुग्णांची नोंद -
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९,१७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १४४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता ३२ हजार २२५ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली असून ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ४६० वर पोहोचला आहे.