Corona virus : लक्षणेविरहित कोरोनाबाधितांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 07:38 PM2020-04-24T19:38:47+5:302020-04-24T19:46:02+5:30
राज्यात सध्या आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६४ टक्के रुग्ण लक्षणे विरहित
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) ताज्या अहवालानुसार, कोणतीही लक्षणे नसताना कोरोनाबाधित आढळून येणारे रुग्ण आणि त्यांच्यापासून पसरणारा संसर्ग ही नवी समस्या ठरत आहे. राज्यात सध्या आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६४ टक्के रुग्ण लक्षणे विरहित आहेत. त्यामुळे लक्षणेविरहित कोरोनाबाधित रुग्णापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान ठरू पाहत आहे. अचूक अँटिबॉडी टेस्टिंग किट विकसित झाल्याशिवाय ही अनिश्चितता कायम राहणार आहे.
मागील आठवड्यात चीनने सादर केलेल्या आकडेवारीमधून, ४४ टक्के संसर्ग हा लक्षणेविरहित कोरोनाबाधित रुग्णांकडून झाल्याचा निष्कर्ष समोर आला. जागतिक आरोग्य संघटना आणि गुंझाऊ मेडिकल युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या एकत्रित संशोधनानातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या रुग्णांचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे. लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे आणि ठळक लक्षणे दिसून येणारे रुग्ण अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा इनक्युबेशन कालावधी हा ५ ते १४ दिवसांचा असतो. काही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतानाच त्यांच्याकडून सुरुवात झालेली असते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती १४-२१ दिवसांनंतर आपोआप बऱ्या होतात. मात्र, त्यांनी या काळात किती लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवलेला आहे, हे शोधून काढणे जिकिरीचे असते, ही बाब अनेक अभ्यासांमधून पुढे आली आहे.
वैद्यकीय तज्ञ डॉ. अच्युत जोशी म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला की तीन ते दहा दिवसांमध्ये लक्षणे दिसायला सुरूवात होते. सर्वामध्येच लक्षणे दिसतील अशी खात्रीही देता येत नाही. लक्षणेविरहित कोरोनाबाधितांना शोधण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंग हाच पर्याय आहे. मात्र, अशा तपासण्यामध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या किट मागे घेण्यात आल्या. अचूक निदान करणाऱ्या अँटिबॉडी टेस्टिंग किट विकसित होऊन त्या प्रायोगिक तत्वावर वापरल्या जाणार नाहीत, तोवर ही अनिश्चितता कायम राहणार आहे.'
----
संसर्ग झाल्यानंतर ती व्यक्ती किती दिवसापर्यंत संसर्ग पसरवू शकते ?
सुरुवातीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कालावधी १४ दिवसांचा मानण्यात आला आहे. मात्र, विषाणू स्वत:चे स्वरूप नव्याने बदलत आहे. आजार पूर्णपणे नवीन असल्याने अद्याप विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. केरळमधील एका ५४ वर्षीय महिलेला परदेशातून प्रवास करून आल्यावर एक महिन्याने कोरोनाची लागण झाली आणि तिचे विलगीकरण करण्यात आले. सध्या रुग्णांना किंवा संशयितांना १४ दिवस विलगीकरण करण्यात येत असले तरी तो कालावधी आता २८ दिवसांपर्यंत वाढला आहे.
------
सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे पाच गटांत वर्गीकरण करता येऊ शकते. कोरोनाचा अजिबात संसर्ग न झालेला पहिला वर्ग, संसर्ग झाला असूनही लक्षणे नसलेला दुसरा वर्ग, सौम्य लक्षणे असलेला तिसरा वर्ग, लक्षणे वाढून कोरोनाबाधित ठरलेला चौथा वर्ग आणि गंभीर प्रकृती असलेल्या कोरोनाबधितांचा पाचवा वर्ग. यातील तिसरा गट हा जास्त धोकादायक ठरत आहे. कारण, या गटातील लोक साधा सर्दी, खोकला आहे असे समजून लॉकडाऊन असल्याने डॉक्टरांकडे जात नाहीत. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या व्यक्ती बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पसरणाऱ्या संसर्गाची भीती जास्त आहे. त्यामुळेच योग्य आणि अचूकता असलेल्या किट विकसित करून दुसऱ्या आणि तिसऱ्या गटापर्यंत पोहोचणे येत्या काळात आव्हानात्मक ठरणार आहे.
- डॉ. अच्युत जोशी, वैद्यकीय तज्ञ