Corona virus : दिलासादायक ! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनच्या मागणीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 12:20 PM2020-10-06T12:20:16+5:302020-10-06T12:22:37+5:30
राज्यात सोमवारी ८३० मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक तर मागणी ७५५ टनांची होती.
राजानंद मोरे-
पुणे : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीत घट होऊ लागली आहे. राज्यात सोमवारी ८३० मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक तर मागणी ७५५ टनांची होती. तसेच कंपन्यांकडून ७६५ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, मुंबईतील ऑक्सिजनची मागणी मात्र तुलनेने काही प्रमाणात वाढल्याचे दिसते.
राज्यात ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ८० टक्के पुरवठा रुग्णालयांना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर हा पुरवठा हळुहळू सुरळीत झाला. पण आता रुग्णसंख्याच कमी होऊ लागल्याने ऑक्सिजनची मागणीही घटली आहे. काही दिवसांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात दि. १२ ऑक्टोबरला ८०९ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. ही मागणी आता सुमारे ५४ टनांनी कमी झाली आहे. तर तेव्हाचा शिल्लक साठा ३८० टनांवरून आता ८३० टनांवर पोहचला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून होणारा पुरवठाही आता काही प्रमाणात कमी झाला आहे. ही मागणी सुमारे १७ टनांनी घटली आहे. तर मुंबईतील ऑक्सिजनच्या मागणीत दि. १२ सप्टेंबरच्या तुलनेत सुमारे १९ टनांनी वाढ झाल्याचे दिसते. मात्र, पुण्यासह अन्य प्रमुख शहरांतील मागणीत घट झाल्याचे आकडेवरून दिसते.
----------------
काही जिल्ह्यांची ऑक्सिजन मागणी व पुरवठ्याची स्थिती (मेट्रिक टनात)
जिल्हा ऑक्सिजनची गरज पुरवठा शिल्लक
५ ऑक्टो. १२ऑक्टो. ५ ऑक्टो. १२ऑक्टो
पुणे २०३ २२० २०९ २१६.५८
मुंबई ११०.५२ ९१.३१ ११०.९८ १७६.०८
ठाणे ६३.१८ ८५.५१ ६५.७ ९०.४८
नागपुर ६३ ३५ ६० ४२
कोल्हापुर ३९ ५० ३७ १६
नाशिक ३५.१९ ५८.५० १९.८१ २३.४३
-----------------------------------------------------
राज्यातील ऑक्सिजनची स्थिती (मेट्रिक टनात)
दि. १२ सप्टेंबर दि. ५ ऑक्टोबर
मागणी ८०९.२२ ७५५.६३
पुरवठा ७६५.८४ ७३५.९३
शिल्लक ३८०.१६ ८३०.०४