Corona Virus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित चाचण्या करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 09:19 PM2020-07-07T21:19:36+5:302020-07-07T21:21:20+5:30
चाचणीसाठी किमान ५० कर्मचारी आवश्यक
पुणे : राज्यातील मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित कोविड चाचण्या करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी किमान ५० कर्मचाऱ्यांच्या चाचणी करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील आस्थापनांसाठी जिल्हाधिकारी व महानगरांमधील आस्थापनांसाठी महापालिका आयुक्तांकडे चाचणीसाठी अर्ज करावा लागेल.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. राज्यातील खासगी व अन्य आस्थापनांकडून तेथील मनुष्यबळाच्या एकत्रित चाचण्या करण्यास परवानगी देण्याबाबत सातत्याने विचारणा होत आहे. यापार्श्वभुमीवर ही मान्यता देण्यात येत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. ही परवानगी मिळण्यासाठी किमान ५० कर्मचारी असणे आवश्यक आहे. आस्थापनेकडून चाचणीसाठी समन्वयकाची नियुक्ती करून जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांकडे अर्ज करावा लागेल. या अर्जामध्ये कोविड चाचणी कोणत्या प्रणालीद्वारे (आरटीपीसीआर, ट्रु नॅट, सीबीनॅट, अॅन्टीबॉडी, अॅन्टीजेन आदी) व कोणत्या प्रयोगशाळेमार्फत केली जाणार आहे, याची माहिती द्यावी लागेल.
प्रयोगशाळेची क्षमता, तेथे शासकीय यंत्रणेमार्फत पाठविण्यात येत असलेले नमुने याची माहिती घेऊन क्षमतेच्या मर्यादेत प्रशासनाकडून चाचणीसाठी मान्यता दिली जाईल. एखाद्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरण कक्षाकडे पाठविणे तसेच इतर थेट संपर्कातील कर्मचाºयांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.