Corona Virus: कोरोनाच्या शिरकावामुळे राज्यात यंत्रणा सतर्क; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:20 AM2020-03-12T03:20:29+5:302020-03-12T03:20:58+5:30

पुण्यात १७ संशयित रुग्ण, गावोगावच्या यात्रा-जत्रा पुढे ढकलल्या

Corona Virus: Corona's alert alerts machinery in the state; Chief Minister reviews | Corona Virus: कोरोनाच्या शिरकावामुळे राज्यात यंत्रणा सतर्क; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Corona Virus: कोरोनाच्या शिरकावामुळे राज्यात यंत्रणा सतर्क; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

googlenewsNext

मुंबई/पुणे : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दुबई फिरून आलेले पुण्यातील कोरोनाबाधीत दाम्पत्य तसेच त्यांच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या राज्यभरातील लोकांवर आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली आहे. अनेक जणांना घरीच वैद्यकीय निगराणीखाली ठेवले असून नागरिकांच्या संपर्कात न येण्याच्या सक्त सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने पुणे जिल्हा प्रशासनाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेऊन उपाययोजनांची माहिती घेतली.

पुण्यातील नायडू रुग्णालयात १७ संशियत रुग्ण दाखल झाले असून, त्यांपैकी ५ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, १० व्यक्तींचे रिपोर्ट एनआयव्ही(नॅशनल इन्स्टिट्युशन आॅफ वायरॉलॉजी) कडे पाठविले असून, २ जणांचे रिपोर्ट संदिग्ध आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित ५ व्यक्तींच्या संपर्कांमध्ये आलेल्या ४३ व्यक्तींना सध्या त्याच्या घरांमध्येच निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने १८ खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्याची सोय केली आहे. पुणे शहरातील १० आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ८ रुग्णालयांमध्ये ही सोय करण्यात आली आहे.

नगरमधील ‘ते’ पाच जण निगरानीखाली
अहमदनगर : परदेशातून आलेल्या नगरमधील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार निगरानीखाली ठेवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकारांना दिली.

१ मार्च रोजी दुबईवरून जे चार नगरकर आले होते, ते एकाच कुटुंबातील आहेत. तपासणीमध्ये त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तसेच १३ दिवसांपूर्वी इटलीहून केडगाव येथील तरूण आला होता. तोही निगरानीखाली आहे.

नागपुरात पाच रुग्ण
नागपूर :येथील शासकीय मेडीकल रुग्णालयातील यंत्रणा सजग करण्यात आली आहे. बुधवारी पुन्हा पाच संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या पाचही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी मेयोमध्ये पाठविण्यात आले आहेत. यातील तीन व्यक्ती संशयीत आहेत, ज्यामध्ये एक रुग्ण इटली, एक सौदी अरेबिया तर एक राजस्थानमधून आल्याची माहिती मेडीकल प्रशासनाने दिली आहे.
इतर दोघे पुण्यातील बाधित रुग्णाचे सहप्रवाशी दांपत्य होत. आतापर्यंत संशयीत म्हणून दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. यापूर्वी ७ संशयीत रुग्णांची सँपल तपासणी करण्यात आली असून त्यातील एकही व्यक्ती बाधित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आशा सेविकांची मदत : वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा सेविकांमार्फत गावोगावी, ‘डोअर-टू-डोअर’ जनजागृती केली जाणार आहे, तसेच पुणे येथे येत्या १३ मार्च रोजी राज्यभरातील साथरोग नियंत्रण अधिकारी आणि बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

भिवंडीत संशयित रु ग्ण
भिवंडी : कोरोनाचा संशयित रुग्ण भिवंडीत बुधवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या रु ग्णास उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे. ६० वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी पुण्याला गेली होती. दोन दिवसांपूर्वी भिवंडीत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला, आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र, प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी गेल्यावर त्यांना कस्तुरबा रु ग्णालयात पाठवण्यात आले. या महिलेचा रक्ततपासणी अहवाल आल्यानंतरच आजाराचे नेमके निदान होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी सांगितले.

आयटी कंपन्यांचा निर्णय वैयक्तिक
पुण्यातील काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असेल; परंतु आयटी कंपन्यांचा हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असून, जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
अफवा पसरविणाºयांवर कारवाई होणार
कोरोना आजारासंदर्भात अफवा अथवा चुकीची माहिती देणाºया व्यक्तीवर सायबर सेलमार्फत कारवाई करण्यात येईल, असे पुण्याच्या जिल्हाधिकाºयांनी बजावले आहेत.

देहूतील दाम्पत्यास तपासणीनंतर घरी सोडले
देहूगाव (पुणे) : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील काळोखे मळ्यातील दुबईवारी करून परतलेले संशयित दाम्पत्याला सकाळी नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. प्राथमिक तपासणीनंतर कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून न आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

Web Title: Corona Virus: Corona's alert alerts machinery in the state; Chief Minister reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.