Corona virus : माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्या : रामदास फुटाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:05 PM2020-04-03T12:05:54+5:302020-04-03T12:07:06+5:30
शासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधींचेदेखील कर्तव्य आहे.
पुणे : शासनाच्या सहकार्यासाठी आता लोकप्रतिनिधीदेखील पुढे सरसावले आहेत. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्यावी, अशी मागणी माजी आमदाररामदास फुटाणे यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील इतर माजी आमदारांनीही आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची तयारी दर्शविली.
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मदतीकरिता उद्योग, चित्रपट, क्रीडाक्षेत्रातील मंडळींनी खारीचा वाटा उचलला आहे. या संकट काळात ‘माणुसकी’चे दर्शन घडत आहे. शासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधींचेदेखील कर्तव्य आहे. याच भावनेतून माजी आमदार रामदास फुटाणे यांनी सर्व आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. ‘लोकमत’ने काही माजी आमदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही आपली कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
.....................
सरकारी कर्मचाºयांचा जर २५ ते ३० टक्के पगार कापला जातो; मग आमच्या लोकप्रतिनिधींचेदेखील काहीतरी कर्तव्य आहे. माझ्या या मागणीला एकही माजी आमदार विरोध करणार नाही, याची खात्री आहे. एकदा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, की कुणी काही बोलणार नाही. आता या संकट काळात प्रत्येकाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत आणि ही राष्ट्रीय आपत्ती समजून प्रत्येकाने आपापल्या परीने शासनाला सहकार्य केले पाहिजे.- रामदास फुटाणे, माजी आमदार.
.........
आमची माजी आमदारांची असोसिएशन आहे. मी तर देणारच आहे; पण सगळ्या माजी आमदारांनादेखील आवाहन करतो त्यांनी आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री साह्यता निधीला द्यावी. लोकांना केवळ सांगून उपयोग नाही. ते कृतीतून दाखविले पाहिजे.- बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार.
............
मी बाळासाहेब थोरातांना हे पूर्वीच म्हटले होते, की तुम्ही स्वत: माजी आमदारांना हे आवाहन करा. त्यांच्या पेन्शनमधून कमीत कमी १० ते २५ हजारांपर्यंतची रक्कम तरी कापून घ्या. कारण काही आमदार असे असू शकतात, की जे उतारवयातले आहेत त्यांना बघायला कुणी नाही. म्हणून सरसकट न घेता काही रक्कम कापून घेण्यात यावी. आजमितीला एक टर्म पूर्ण केलेल्या माजी आमदाराला ५० हजार रुपये पेन्शन मिळते. त्यातील किमान २५ हजार रुपयांची रक्कम कापून घेऊन ती देण्यात यावी.- उल्हास पवार, माजी आमदार