corona virus : .. अखेर राज्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णांची ‘खडतर’ संघर्षातून मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:49 PM2020-03-25T13:49:49+5:302020-03-25T14:14:35+5:30
गेली १४ ते १५ दिवस डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले...
पुणे: जगभरात थैमान घातल्यानंतर कोरोनाने महाराष्ट्रात पहिल्यांदा पाऊल ठेवले ते पुण्यात. दुबईहून प्रवास करुन पुण्यात परतलेल्या एका जोडप्याला कोरोनाने लक्ष्य केले होते.त्यानंतर त्यांच्या मुलासह त्यांना पुण्याला घेऊन आलेल्या कारचालकाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आणि सुरु झाला कोरोना विरुध्दच्या लढाईचा प्रवास. गेली १४ ते १५ दिवस कुटुंब, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. या कोरोनाबाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्यांच्या डिस्चार्जचा मार्ग मोकळा झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली . यासोबतच त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच सर्वांच्या मदतीने कोरोनावर लवकरात लवकर मात करु, असा विश्वासही व्यक्त केला.
म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले होते, त्यापैकी ७३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६९२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्के अहवाल निगेटीव्ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचे नागरिकांनी कुठेही उल्लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्हणाले, या २१ दिवसांत आपल्या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करु शकते. कोणत्याही जीवनावश्यक वस्तू म्हणजे औषधी, भाजीपाला, अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्?यांनी केले.
आरोग्य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्या इतर जिल्ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्लंघन करुन निघून जात असतील तर त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्वत:ला सुरक्षित ठेवा, त्याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्हणाले.