Corona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:25 PM2020-04-04T13:25:56+5:302020-04-04T13:33:49+5:30

पुढील एक-दोन आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढणार

Corona virus : Increasing lockdown in hotspot is very necessary : Subhash Salunkhe | Corona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे

Corona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगलीकेवळ लॉकडाऊन नव्हे तर लोकांसह सर्व यंत्रणांकडून सुरू असलेले प्रयत्नही महत्वाचे पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल

राजानंद मोरे - 

प्रश्न - देशातील कोरोना विषाणुच्या संसर्गाची सद्यस्थिती काय आहे?

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे अपेक्षितच होते. परदेशातून आलेल्या लोकांमध्ये भारतात कोरोनाने प्रवेश केला. आपल्याकडे चीनमधून फारसे लोक आले नसले तरी मध्य पुर्व देश, अमेरिका, युरोपमधून आलेल्या लोकांमुळे भारतात संसगार्ला सुरूवात झाली. या लोकांच्या संपर्कात आलेल्यांमध्येही त्याचा संसर्ग वेगाने होत गेला. हे स्वाभाविकच होते. आता हा विषाणु आपल्या देशात स्थिरावला आहे, यात दुमत नाही. त्यामुळे स्थानिकांनाही संसर्ग होऊ लागला आहे. अजूनही आपण दुसऱ्या टप्प्यातच आहोत. याला ' क्लस्टर ' संसर्ग म्हणता येईल. पण 'कम्युनिटी ट्रान्समिशन'च्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यामुळे पुढील एक-दोन आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढणार आहे. पण हे आकडा किती वेगाने वाढतोय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यावर पुढील उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
------------
प्रश्न - कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा किती फायदा होईल?
लॉकडाऊन आवश्यकच होते. त्याचा लोकांना खुप त्रास होत असला तरी त्याचा कोरोनाला रोखण्यासाठी फायदा होणार आहे. संसर्ग कमी करण्यासाठी हे करणे गरजेचे होते. त्यामुळे सध्या आपल्याकडील प्रमाण तुलनेने कमी दिसत आहे. पण केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही. तर सध्याच्या कोरोनाबाधित व संशयित रुग्णांचा शोध घेणे, त्यांना विलग करणे, उपचार, त्यांचे संपर्क शोधणे हेही महत्वाचे आहे. त्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, पोलिस या सर्वांच्या समन्वयातून हे काम खुप वेगाने सुरू आहे. त्याचाही फायदा होत आहे. असे म्हटले जातेय की तीन-आठवड्यांपुर्वीच्या स्थितीमध्ये काही देश होते, त्या स्थितीत आपण आहोत. अमेरिका, चीन, इटली, स्पेन या देशांमधील स्थिती सध्या भयावह आहे. सध्या पुण्यात दररोज ६ ते ८ रुग्ण सापडत असतील आणि पुढील काही दिवसांत त्याचा गुणाकार होत गेला तरच या देशांसारखी स्थिती निर्माण होईल. ही चिंतेची बाब असेल. त्याला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात घरी बसून राहणे गरजेचे आहे.
----------------------
प्रश्न - लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल का?
लॉकडाऊनमुळे अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. पुढेही ही स्थिती चांगलीच राहील, याची खात्री आहे. पण केवळ लॉकडाऊन नव्हे तर लोकांसह सर्व यंत्रणांकडून सुरू असलेले प्रयत्नही महत्वाचे आहे. असे असले तरी पुढील एक-दोन आठवड्यांतील स्थितीवरून लॉकडाऊन बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. संपुर्ण देशात लॉकडाऊन राहण्याची शक्यता कमी आहे. पण' हॉटस्पॉट' असलेल्या पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल. किमान तेथील सार्वजनिक वाहतुक बंद ठेवणे, केवळ अत्यावश्यक सेवांच्या आस्थापना सुरू ठेवाव्या लागतील. कमीत कमी गर्दी होईल, यावर भर द्यावा लागेल. तसेच काही ठराविक भागापुरत्याही उपाययोजना करता येतील. त्यादृष्टीने प्रशासनाला निर्णय घ्यावाच लागेल.
-----------------
प्रश्न - महाराष्ट्र व देशातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत का?
प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडील आरोग्य सुविधा तितक्या चांगल्या व पुरेशा नाहीत. शासकीय व खासगी रुग्णालयांमधील उपकरणे, सुविधांची जुळवाजुळव केली जात आहे. पीपीई कीट, मास्क तसेच इतर साहित्य मिळविले जात आहे. त्यादृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. पण ही संख्या वाढत गेल्यास ही यंत्रणा मोडकळीस येऊ लागले. हे होऊ नये म्हणून आता आपण विविध उपाययोजना करून लोकांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील किमान तीन महिने विविध माध्यमातून प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. त्यामध्ये लोकांचे समुपदेशनाचा भागही महत्वाचा आहे.
--------------
प्रश्न - चाचण्यांचे प्रमाण वाढवावे लागेल का?
केंद्र सरकारने रॅपिड टेस्ट घेण्यास मान्यता दिली आहे. त्याची सुरूवात लवकरच होईल. चाचणी कोणाची घ्यायची, याबाबत धोरण ठरले आहे. कीट उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत संसर्ग किती वाढतोय याचे आडाखे बांधू शकतो. त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या जातील.
---------------
प्रश्न - लोकांना काय आवाहन कराल?
कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. तसेच कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे खुप भयंकर आजार झाला असेही समजू नका. ८५ चे ९० टक्के लोकांना कमी तीव्रतेची लक्षणे दिसतात. ते उपचारानंतर लगेच बरे होतात. उर्वरित सुमारे १० टक्के लोकांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांचे सहकार्य लागणार आहे. घराबाहेर न पडणे, लक्षणे असल्यास स्वत:हून पुढे येणे, इतरांशी संपर्क टाळणे, विनाकारण बाहेर न फिरणे, प्रशासनाला सहकार्य करणे या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'सोशल डिस्टन्सिंग' हा एकमेव पर्याय आहे.
------------

--

Web Title: Corona virus : Increasing lockdown in hotspot is very necessary : Subhash Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.