Omicron Corona Virus Updates: महत्त्वाची बातमीः ओमायक्रॉन वाढल्यास घातक 'डेल्टा'ची तीव्रता होईल सौम्य; टास्क फोर्स तज्ज्ञांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:05 PM2021-12-29T20:05:46+5:302021-12-29T20:11:39+5:30
Omicron Corona Virus Updates: कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल, असे राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी म्हटले.
- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन संसर्गाच्या आजाराचे स्वरुप सौम्य आहे. त्यामुळे ओमायक्रॉनची लाट वाढत असल्यास डेल्टासारखा घातक विषाणू मागे टाकला जाईल, असे निरीक्षण असल्याची माहिती संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली.
कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल. बूस्टर मात्रेला दिलेल्या संमतीविषयी डॉ. नागवेकर यांनी सांगितले की, या निमित्ताने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यांच्यासाठी ही मात्रा निश्चितच उपयुक्त ठरेल. बूस्टर मात्रेनंतर एक वा दोन वर्षांच्या अंतराने कायम आपल्याला कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे लागणार आहे, असेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.
कोरोना कायम राहणार !
कोरोना हा आता आपल्यासोबत कायमच राहणार आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मात्र मलेरियासारख्या आजाराच्या स्वरुपात ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव कायम असेल असेही डॉक्टरांनी नमूद केले.
पार्टी, सामूहिक गाठीभेठी हे संसर्गाचे केंद्र
वर्षाखेरीस निमित्ताने होणाऱ्या पार्टी, कार्यक्रम किंवा सामूहिक जेवण, गाठीभेटींचे कार्यक्रम ही कोरोना संसर्गाची मुख्य केंद्र आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळणे, तसेच मास्क तोंडाच्या खाली घेऊन किंवा विनामास्क फिरणे हे समूह संसर्गाच्या दृष्टिने घातक आहे.
सर्जिकल मास्क वापरा, दुहेरी मास्किंग करा
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असताना ‘दुहेरी मास्क’ वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग आहे. कारण अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरीत्या बसत नाहीत. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी करता येईल.
अधिक सखोल संशोधनाची गरज
ओमायक्रॉनची संक्रमणक्षमता अधिक असली तरी, तो डेल्टापेक्षा कमी तीव्र आहे. लाँग-कोविडच्या स्वरूपात त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आणि पुरावे आवश्यक आहेत. या नवीन अभ्यासानुसार, ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात डेल्टाविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती चौपटीने वाढते. मात्र याच्या अंतिम निर्णयासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज आहे. त्यामुळे देशाने संशोधनात अधिक गुंतवणूक केली पाहिजे.
- डॉ राहुल पंडित, राष्ट्रीय आणि राज्य कोरोना टास्क फोर्स, सदस्य