देवाघरी गेला अकाली आपला पांडुरंग..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:23 AM2020-09-07T11:23:24+5:302020-09-07T11:29:46+5:30
कोरोनाशी झुंज देताना हुतात्मा झालेल्या कोविडयोद्धा पत्रकार पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
बूम बोले लेखणीला, झाला रंगाचा बेरंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥धृ॥
कोरोनाने गिळले रंक आणि राव
यात नाही कोणताच केला भेदभाव
जागे होऊ आता सारे देऊ साथसंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥१॥
पत्रकारितेत पोटापायी काया झिजवली
संसर्ग सोसुनिया बातमी पोहोचवली
डळमळू लागे चौथा लोकशाहीचा स्तंभ
देवाघरी अकाली गेला आपला पांडुुरंग ॥२॥
तत्पर वार्तांकनी देह बुडूनिया जाई
घर-दार, बायको-मुले पोरकीच होई
मदतनिधी मिळणारा मात्र गेला नि:संग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥३॥
कोण-कशाबद्दल-कुठे-केव्हा-का नि कसे?
बातमीत उत्तर शोधताना पत्रकारच फसे
स्पॉटवरून लाईव्ह, पण लाईफ होई भंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥४॥
अनेकांवर अन्यायाला फोडली वाचा
प्रश्नांनी माझ्या बंद प्रस्थापितांची भाषा
घेई विषाणू दंश, पण मी बाईटमध्ये दंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥५॥
लॉकडाऊनमध्ये जग असताना ठप्प
पत्रकार माझ्यातला राहील कसा गप्प
सामान्यांच्या व्यथांचे उलगडे अंतरंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥६॥
जनतेच्या कथा-व्यथांना फोडले तोंड
उलगडले घोटाळे, सत्तांधांचे कांड
कधी उघड केले या समाजाचे व्यंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥७॥
बातमी करताना झाला तोच बातमी
किंमत मोजली करून काम जोखमी
गेली निघुनिया वेळ, नका घालू वादंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥८॥
देऊन स्पॉट न्यूज, फीड, फोनो, स्क्रोल
व्हॉईसओव्हर शांत, संपला त्याचा रोल
फ्रंटपेज स्टोरी त्याची, झाली ब्रेकिंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥९॥
वेळ अशी आता कुणावरी न येवो
रोगातून या प्रत्येक बरा होऊन जावो
होऊ कोरोनामुक्त, विश्वास हा अभंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥१०॥
बूम बोले लेखणीला, झाला रंगाचा बेरंग
देवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग॥
- अभय नरहर जोशी -