corona virus- मुंबईच्या उद्योगपतीचा उद्योग आला अंगलट, वधवाना कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:11 PM2020-04-10T12:11:29+5:302020-04-10T12:40:25+5:30

गृह विभागाचे प्रधान सचिवांचे विशेष पत्र घेऊन हे उद्योगपती सीमाबंदीचा आदेश तोडून दोन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून लवाजम्यासह महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्याकडे तातडीने प्रवास करण्याबाबत कोणतेही ठोस कारण न सापडल्याने 23 जणांविरोधात महाबळेश्वर पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

corona virus - Mumbai's businessman came to England | corona virus- मुंबईच्या उद्योगपतीचा उद्योग आला अंगलट, वधवाना कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल

corona virus- मुंबईच्या उद्योगपतीचा उद्योग आला अंगलट, वधवाना कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमुंबईच्या उद्योगपतीचा उद्योग आला अंगलटवधवाना कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल

महाबळेश्वर : लोणावळ्या जवळील खंडाळा येथील बंगल्यात राहून कंटाळा आल्याने आपल्या महाबळेश्वर येथील बंगल्यात राहण्यासाठी आलेल्या धीरज वधवान या उदयोगपतीसह त्याच्या कुटूंबातील 9 जण व त्यांचे नोकरचाकर 14 अशा 23 जणांना पांचगणी येथील एका खास इमारतीत इंन्सिटट्युशनल होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

गृह विभागाचे प्रधान सचिवांचे विशेष पत्र घेऊन हे उद्योगपती सीमाबंदीचा आदेश तोडून दोन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून लवाजम्यासह महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्याकडे तातडीने प्रवास करण्याबाबत कोणतेही ठोस कारण न सापडल्याने 23 जणांविरोधात महाबळेश्वर पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी याबाबत महाबळेश्वर पोलीसात तक्रार दाखल केली असून कपिल वाधवान (वय 46 ) अरुणा वाधवान ( 68 ), वनिता वाधवान ( 41 ), धीरज वाधवान ( 40 ), कार्तिक वाधवान ( 19 ), पूजा वाधवान ( 41 ), शत्रुघन घाग ( 48 ), मनोज यादव ( 43 ), मनोज शुक्ला (45 ), अशोक वफेलकर ( 45 ) दिवान सिंग ( 48 ), अशोक मंडल ( 42 ), लोहित फर्नांडिस ( 33 ), जसप्रीत सिंग ( 30 ), जस्टिन डिमेलो ( 43 ) इंद्रकांत चौधरी ( 52 ), एलिझाबेथ आययापिलाई ( 42 ), रमेश शर्मा ( 42 ), प्रदीप कांबळे ( 27 ), तारका सरकार ( वय 39 ) या 23 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि 144 कलमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना व्हायरचा धोका लक्षात घेता संपुर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशा नुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हयाच्या सर्व सीमा बंद केल्या असून जिल्हा ओलांडून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही बुधवारी रात्री मुंबईचे उदयोगपती धीरज वधवान आपल्या कुटुंबातील 9 सदस्य तसेच वाहनचालक, आचारी व इतर 14 कर्मचारी असे 23 जण महाबळेश्वरकडे रवाना झाले.

वाटेत पोलिस अडवणूक करणार याची त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र बरोबर घेतले. एव्हढया मोठया अधिकाऱ्याचे पत्र पाहिल्या नंतर त्यांना कोणी अडविले नाही. विनात्रास त्यांचा प्रवास झाला व बुधवारी रात्री ते महाबळेश्वर येथील आपल्या बंगल्यात दाखल झाले.

महाबळेश्वर मध्ये प्रवेश केल्या नंतर ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने ही माहीती येथील तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना कळविली व सर्व प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन करून जर कोणी जिल्हयात दाखल झाले. तर अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे या बाबत राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या उदयोगपतीचे संपुर्ण कुटूंब क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी महाबळेश्वर येथे आलेले उदयोगपतीचे कुटूंब पांचगणी येथे हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. गुरूवारी सकाळी उदयोगपतीच्या बंगल्यावर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील हे आपले कर्मचारी यांचे समवेत तसेच वैदयकिय अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पालिकेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व त्यांचे कर्मचारी दाखल झाले. बंगला बंद करण्यात आला.

बंगल्यातील सर्वांची ग्रामीण रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ. राजीव शहा व डॉ. आदर्श नायर यांनी तपासणी केली. या तपासणी मध्ये कोणालाही करोनाची बाधा झाल्याची लक्षणे आढळली नाही. त्यामुळे प्रशासनाचा जीव भांडयात पडला. तहसिलदार चौधरी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहीती उदयोगपतीला दिली.

काही वेळी उदयोगपतीने फोनाफोनी केली, परंतू जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल न केल्याने अखेर उदयोगपतीने पांचगणी येथे जाण्याची तयारी सुरू केली. एका तासात सर्व आटोपल्या नंतर सर्व सामान गाडयांमध्ये भरण्यात आले, प्रथम पुढे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची गाडी, त्या नंतर रूग्णालयाची रूग्णवाहीका, त्या मागे ओळीने उदयोगती व त्यांच्या कुटूंबाच्या सहा आलिशान गाडया, त्यामागे पोलिस गाडी व सर्वांत शेवटी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांची गाडी असा वाहनांचा ताफा गुरूवारी दुपारी 12 वाजता महाबळेश्वर येथील एका बंगल्यातुन बाहेर पडला.

हा ताफा शहराबाहेरील रस्त्याने हिरडा नाक्यावरून वेण्णालेक व तेथून पांचगणी येथे शासनाच्या खास इमारतीमध्ये पोहचला. याच ठिकाणी उदयोगपतीचे संपुर्ण कुटुंबाला इंस्टिट्युट क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पुढील 14 दिवस याच इमारती मध्ये या उदयोगपतीच्या कुटूंबाचा मुक्काम असेल. या इमारतीला चोहो बाजुंनी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन या इमारती मधुन आता कोणालाही बाहेर पडता येणार नसल्याची माहीती प्रशासनाने दिली.


 

Web Title: corona virus - Mumbai's businessman came to England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.