Corona virus : राज्य सरकारने खासगी डॉक्टरांवर मोफत उपचारांची सक्ती करू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 02:39 PM2020-04-18T14:39:05+5:302020-04-18T14:46:49+5:30
खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत असे शासनातर्फे आवाहन
पुणे : राज्यातील अनेक भागामध्ये शासनाची रुग्णालये ' कोवीड ' रुग्णालयांमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहेत. या काळात खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र, खासगी डॉक्टर आर्थिक ताण सोसत असताना त्यांच्यावर मोफत उपचारांची सक्ती करू नये, अशा आशयाचे आवाहन इंडियन मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र राज्यातर्फे शासनाला करण्यात आले आहे.
संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र सध्या कोरोनाविरोधातील लढाई नेटाने लढत आहेत. खासगी डॉक्टरही शासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. मात्र, खाजगी डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, ही शासनाची अपेक्षा काहीशी अयोग्य असून त्याबाबत पुर्नविचार करण्यात यावा असे आवाहन इंडियन मेडिकल कौन्सिलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे, अशी माहिती आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
शासनाकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांसारख्या चांगल्या योजना कार्यरत आहेत. शासनाने स्वतंत्र यंत्रणा तयार करून, सर्वसामान्य रुग्णांना या योजनांअंतर्गत उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सर्व खाजगी दवाखान्यांमध्येही या योजना कार्यान्वित कराव्यात, खासगी डॉक्टरांना देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशा काही मागण्या आयएमएतर्फे करण्यात आल्या आहेत.
सध्या आरोग्य यंत्रणा आधीच नाजूक अवस्थेत असताना नवीन नोटिसांमुळे डॉक्टरांवरील ताण वाढू शकतो. त्यामुळे खाजगी डॉक्टरांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय लादू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना साथीच्या काळात खाजगी डॉकटर शासनाला सर्वतोपरी सहकार्य करत असल्याची बाबही यात अधोरेखित करण्यात आली आहे.
अनेक खाजगी डॉक्टरांनी कर्ज काढून आपले दवाखाने सुरू केले आहेत. कॉपोर्रेट रुग्णालयांच्या तुलनेत छोटे दवाखाने असणा?्या डॉक्टरांसमोरील आर्थिक प्रश्न खूप मोठे आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आर्थिक कळ सोसत त्यांनी आपले दवाखाने सुरू ठेवले आहेत. अपुरे मनुष्यबळ असतानाही डॉक्टर सर्वसामान्य रुग्णांवरील उपचारांसाठी दवाखाने सुरू ठेवून झटत आहेत. खाजगी डॉक्टरांवर मोफत उपचार देण्याची सक्ती केल्यास अनेकांना नाईलाजाने दवाखाने बंद ठेवावे लागतील आणि त्यामुळे गैरसोय निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आयएमएतर्फे मोठ्या शहरांमध्ये कम्युनिटी क्लिनिक,. छोटी शहरे आणि तालुक्यांमध्ये रक्षक दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. ज्या शहरामध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा ठिकाणी आयएमएची ५० मोबाईल क्लिनिक कार्यरत असतील. कोव्हिड रुग्णांसाठी असलेल्या हाय डिपेंडन्सी सेंटरमध्ये आयएमएचे सदस्य स्वयंस्फुतीर्ने काम पाहण्यास सज्ज आहेत. साथीच्या आजारादरम्यान आपल्या अनुभवाचा जास्तीत जास्त उपयोग ते वैद्यकीय क्षेत्राला करून देतील, असे विविध निर्णय आयएमएतर्फे शासनाला कळवण्यात आले आहेत. यावेळी घेण्यात आले.
.