Corona virus : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे 'फुकट'च्या पदवीसाठी साडेअकरा हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 07:20 AM2020-06-28T07:20:15+5:302020-06-28T07:25:01+5:30
कोरोनाचा विद्यार्थ्यांकडून गैरफायदा
पुणे: कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तब्बल ११ हजार ५०० विद्यार्थ्यांनी २५ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र मिळू शकते,या विचारातून अनेक विद्यार्थ्यांनी हे अर्ज हे केल्याचे विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्च २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ५ जानेवारी ते ८ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु, कोरोनाचे संकट आल्याने विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाहीत त्यांना विद्यापीठाने अर्ज करण्यास मुदत द्यावी,अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली. त्यावर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने ५ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज भरणे अपेक्षित होते.परंतु,अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत.त्यामुळे तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली.
राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना मागील सत्रातील गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांना परीक्षा देऊन पदवी प्रमाणपत्र हवे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे परीक्षा न देता पदवी मिळू शकते,या मानसिकतेतून कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या तब्बल ११ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
द्वितीय व तृतीय वर्षाचे बॅकलॉगचे विषय राहिलेलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ टक्के विद्यार्थी दरवर्षी परीक्षा अर्ज भरत नाहीत. परंतु, यंदा या ४ टक्क्यांपैकी सुमारे २ टक्के विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. त्यात २०१४ व २०१५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परीक्षा न देता आपण उत्तीर्ण होऊ, असे या विद्यार्थ्यांना वाटत,असले तरी प्रत्यक्षात तसे होणार नाही,असेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
--------------------------------------------
परीक्षा झाल्यावर विद्यापीठाने परीक्षा अर्ज का स्वीकारले ?
कोरोनामुळे परीक्षा होणार आहेत किंवा नाहीत; या बाबत स्पष्टता नसताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचा निर्णय का घेतला? या मागील तार्किता विद्यापीठाने समजून सांगितली पाहिजे.त्याचप्रमाणे केवळ विद्यापीठ अधिकार मंडळाच्या काही व्यक्तिंच्या आग्रहामुळे परीक्षा अर्ज भरण्यास तीन वेळा मुदतवाढ का देण्यात आली,याचेही उत्तर विद्यापीठाने द्यायला हवे. विद्यापीठ अनुदान आयोग किंवा राज्य शासनाने परीक्षा न घेताच सर्वांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यास विद्यापीठ सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्काचे पैसे परत देणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.